लोणी कंद , ता. 12 : जावयाचा मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर त्याचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार लोणीकंद पोलिसांच्या तपासात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आजे सासरे आणि सासरे अशा दोघांना अटक केली आहे.

रहीम मोहम्मद शेख (वय-65) आणि अमर रहीम शेख (वय-45, दोघे रा. चौफुला वस्ती, कोलवडी, ता. हवेली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सुलतान सादीक शेख (वय-24, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) असे मृत जावयाचे नाव असून, त्याचा भाऊ साबीर सादीक शेख (वय -26) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलतान शेख हा रिक्षाचालक होता. त्याचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. पत्नीबरोबर झालेल्या वादानंतर 9 नोव्हेंबर रोजी त्याची सासू आणि सासरे पत्नीला घेऊन माहेरी गेले होते. त्यानंतर पत्नीचा शोध घेत सुलतान रात्री चौफुला वस्ती येथील सासरी गेला. त्यावेळी आजे सासरे रहीम शेख आणि सासरे अमर शेख यांनी त्याला लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत सुलतानचा मृत्यू झाला.

त्यानंतर आरोपींनी सुलतानला रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यावेळी सुलतानचा दुचाकीवरून पडल्याने अपघात झाला आणि त्यात तो जखमी झाल्याचे आरोपींनी सांगितले. त्यामुळे सुरुवातीला त्याच्या मृत्यूमागे अपघात असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मात्र, लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, आरोपींच्या घरासमोर अपघात झाल्याच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. घटनास्थळी दुचाकीही पडलेली नव्हती. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यानंतर सखोल चौकशी केली असता, आरोपींनी सुलतानला मारहाण केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. मारहाणीसाठी वापरण्यात आलेला लाकडी दांडकाही पोलिसांनी जप्त केला आहे.
दरम्यान, या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे यांनी माहिती दिली. पोलीस निरीक्षक पवार पुढील तपास करीत आहेत.






