शिरूर: शिरूर (Shirur News) शहर विकास आघाडीचे प्रमुख आणि जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल यांनी व्यवसायातील व्यस्ततेमुळे आगामी शिरूर नगरपरिषद निवडणुकीतून माघार घेतल्याचे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयाने शिरूर शहरात एकच खळबळ उडाली असून समर्थकांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

शुक्रवारी (ता.07) संध्याकाळी धारीवाल शिरूरला दाखल झाल्यानंतर त्यांच्या ‘आशीर्वाद’ निवासस्थानी नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी निवडणुकीसंदर्भात निर्णय जाहीर करताना त्यांनी सांगितले की, “व्यवसायातील जबाबदाऱ्यांमुळे निवडणुकीत सहभागी होता येणार नाही.” त्यांच्या या वक्तव्याने उपस्थित सर्वजण आश्चर्यचकित झाले.
अनेक कार्यकर्त्यांनी “शिरूरच्या विकासासाठी तुम्हीच पाहिजे” असा आग्रह धरत निर्णय बदलण्याची विनंती केली. मात्र धारीवाल यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत असल्याचे सांगितले, “शहराच्या विकासासाठी मी नेहमी शिरूरकरांसोबत आहे, पण या वेळी प्रत्यक्ष निवडणुकीत सहभाग घेणे मला शक्य नाही.”
यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, ॲड.सुभाष पवार, मनसुखलाल गुगळे, पांडुरंग थोरात, जाकिरखान पठाण, नामदेवराव घावटे, अरुण घावटे, विठ्ठल घावटे यांच्यासह अनेक आजी-माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
प्रकाश धारीवाल यांनी पुढे स्पष्ट केले की, “माझ्याशी सर्व पक्षांच्या नेत्यांनी संपर्क साधला, परंतु शहर विकास आघाडी या वेळी निवडणूक लढवणार नाही. त्यामुळे निवडीत कोणाचाही रोष पत्करायचा नाही.”
या निर्णयामुळे शिरूरच्या नगरपरिषद निवडणुकीचे राजकीय चित्र बदलण्याची शक्यता वर्तवली जात असून, समर्थकांमध्ये मात्र वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. तसेच “धारीवाल यांच्या शिवाय शिरूरचा विकास कोण करणार.” असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
“मी गेली अनेक वर्षे शिरूरकरांच्या सोबत काम केले आहे. या काळात सर्वांचे मोलाचे सहकार्य मिळाले, पण काही बाबतीत मानसिक ताणही सहन करावा लागला.” तसेच व्यवसायाच्या कारणास्तव मी स्वतःला निवडणूक प्रक्रियेतून दूर ठेवत आहे.
-प्रकाश धारिवाल(प्रसिद्ध उद्योगपती आणि शिरूर शहर विकास आघाडीचे प्रमुख नेते)







