शिरूर: शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे (Shirur Crime) येथे प्रापंचिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी हातोडीने प्रहार करून तिचा खून केल्याची (Shirur News) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, पत्नीचा जीव घेतल्यानंतर आरोपी स्वतः शिक्रापूर पोलीस ठाण्यात हजर झाला. (Pune Crime)

सविता मनोहर कांबळे (वय 38), सध्या रा. आरंभ सोसायटी, तळेगाव ढमढेरे, मूळ रा. शिरसो श्रीरामनगर, ता. मूर्तिजापूर, जि. अकोला, असे मृत महिलेचे नाव आहे. तर मनोहर नागोराव कांबळे (वय 53) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पहाटेच्या सुमारास एक व्यक्ती शिक्रापूर पोलीस ठाण्यात येऊन “मी माझ्या बायकोचा खून केला आहे” अशी कबुली दिल्याने पोलिसही क्षणभर स्तब्ध झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन तळेगाव ढमढेरे येथील त्याच्या घरी धाव घेतली. घराला बाहेरून कडी लावलेली होती. आत प्रवेश केल्यानंतर सविता कांबळे या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळल्या. त्यांच्या शेजारी लोखंडी हातोडी पडलेली होती.
पोलिसांनी तातडीने त्यांना रुग्णालयात हलवले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणी राजेश मनोहर कांबळे (वय 19) यांनी फिर्याद दिल्यानंतर आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. घटनेने परिसरात खळबळ उडाली असून कौटुंबिक तणावाचे भीषण रूप पुन्हा एकदा समोर आले आहे. पोलिसांकडून यासंदर्भातला पुढील तपास सुरू आहे.







