पुणे: कामावर जाणाऱ्या एका तरुणीचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना फुरसुंगी येथे घडली. पुणे-सासवड मार्गावर भोसले व्हिलेजच्या प्रवेशद्वारासमोर भरधाव हायवा डंपरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणीचा मृत्यू झाला, तर मोटारसायकल चालवणारा तरुण गंभीर जखमी झाला. अपघातानंतर डंपरचालक घटनास्थळावरून पळून गेल्याची माहिती आहे.

माधुरी सतीश जाधव (वय 23, रा. भेकराईनगर, फुरसुंगी) असे मृत तरुणीचे नाव आहे. अभिजित ज्ञानदेव जाधव (वय 31, रा. तुळजाभवानीनगर, खराडी) यांनी या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार डंपरचालक मनोहर रामदास हाके (वय 29, रा. उरुळी कांचन, मूळ रा. भरतगाव, हाकेवाडी, ता. दौंड) याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
माधुरी या उंड्री परिसरातील एका कंपनीत नोकरीला होत्या. शनिवारी सकाळी त्या अभिजित यांच्या दुचाकीवरून भेकराईनगर येथून मंतरवाडीकडे कामावर जात होत्या. सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास भोसले व्हिलेज गेटजवळ मागून आलेल्या हायवा डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेमुळे दोघेही रस्त्यावर पडले. या अपघातात माधुरी यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. फुरसुंगी पोलिसांनी डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भूषण पोटवडे करीत आहेत.







