लोणी काळभोर, ता. 02: संत नामदेव महाराजांच्या अध्यात्मिक संदेशाचा प्रसार, बंधुता-समानता यांचा प्रचार, पर्यावरण संरक्षण आणि आरोग्यविषयी जागरूकता या पवित्र उद्देशाने पंढरपूर ते घुमान (पंजाब) अशी अडीच हजार किलोमीटर रथयात्रा व सायकल वारी यशस्वीरीत्या पूर्ण झाली. 2 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2025 या कालावधीत झालेल्या या वारीचे आयोजन भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ, नामदेव महाराज दरबार कमिटी आणि समस्त नामदेव शिंपी समाज यांच्या वतीने करण्यात आले.

आरोग्यदायी व पर्यावरणपूरक सायकलवारीद्वारे समतेचा, भक्तीचा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दूरवर पोहोचवण्याचा हेतू या वारीमागे होता. या वारीत 75 सायकलिस्ट, 35 वाहनातून प्रवास करणारे सदस्य, तसेच डॉक्टर, सायकल मेकॅनिक, भजनी मंडळ आणि व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणारे अनेक सहकारी सहभागी झाले होते.
हि वारी पंढरपूरहून सुरू होऊन महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबातील प्रमुख शहरांतून पुढे सरकली. फलटण, पुणे, नाशिक, सुरत, अहमदाबाद, अबू रोड, पाली, मेदता, हिसार, पटियाला, चंदीगड अशा ठिकाणी वारीचे प्रेमळ स्वागत करण्यात आले. गावोगाव झालेल्या कीर्तन-भजनांमुळे भक्तीमय वातावरण निर्माण झाले. निवास, भोजन आणि सुरक्षा व्यवस्था स्थानिक भक्तांकडून अत्यंत आत्मीयतेने करण्यात आली.
आरोग्य, पर्यावरण आणि भक्तीचा संगम, दीर्घ सायकल प्रवासामुळे सदस्यांची तंदुरुस्ती वाढली तर निसर्गसौंदर्याचा अनुभव आणि संत नामदेव महाराजांच्या शिकवणींचा प्रभाव मनावर बिंबला. वारीत पुढील मूलभूत संदेशांवर भर देण्यात आला. बंधुता, समानता व सामाजिक एकता भागवत धर्माची साधना, पर्यावरण संवर्धन, सायकल या प्रदूषणमुक्त वाहतुकीचे महत्त्व, युवकांसाठी शिस्त व फिटनेसचे प्रेरणादायी उदाहरण ठरले.
दरम्यान, वारीचे नियोजन सुर्यकांत भिसे, मांढरे, कापसे व आयोजन समितीने केले. प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे सदस्य व फुरसुंगी गावचे गोरख कामठे, अशोक चौधरी, शिरिष लोणकर, दिनेश निकुंभ, वैभव गोडसे, बाळकृष्ण वेताळ, मारुती पवार, तसेच महाराष्ट्रातील अनेक सायकलिस्ट सहभागी झाले होते. ही वारी म्हणजे केवळ प्रवास नव्हता; भक्ती, नैतिक मूल्ये, पर्यावरण प्रेम आणि मानवी एकतेचा अनुभव देणारी आयुष्यभर लक्षात राहणारी संस्मरणीय यात्रा ठरली. असेही फुरसुंगी येथील सायकलस्वार गोरख कामठे यांनी सांगितले.
घुमान येथे समाधी दर्शनाचा अध्यात्मिक समारोप
25 नोव्हेंबर 2025 रोजी वारी अंतिम टप्प्यात संत नामदेव महाराजांच्या समाधीस्थळ घुमान (पंजाब) येथे पोहोचली. “बाबा नामदेव” पवित्र वास्तूत भजन, कीर्तन व दर्शनाने वारीचा अध्यात्मिक समारोप झाला.







