पुणे : चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. तळेगाव-चाकण-शिक्रापूर या महत्त्वाच्या मार्गावरील खड्डे 31 ऑगस्टपर्यंत बुजवून रस्ता खड्डेमुक्त करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. तसेच चाकण एमआयडीसी परिसरातील रस्ते आणि नाल्यांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी संबंधित विभागांना 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत चाकण परिसरातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. पावसाळ्यात रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि त्यातून वाढणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन रस्ते दुरुस्तीला तातडीने प्राधान्य देण्याच्या सूचना करण्यात आल्या.

तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाची दुरुस्ती संबंधित रस्ते मालकीच्या यंत्रणांनी ठरलेल्या मानक कार्यपद्धतीनुसार करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय एचपी चौक ते चाकण या भागाचे टोटल स्टेशन सर्वेक्षण करून त्याचा अहवाल 8 दिवसांत तांत्रिक सल्लागारांकडे देण्यास सांगण्यात आले आहे.

चाकण परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा हा देखील मोठा प्रश्न आहे. पाणी साचण्याची समस्या कायमची दूर करण्यासाठी स्टॉर्म वॉटर ड्रेनचा स्वतंत्र आराखडा तयार केला जाणार आहे. भविष्यातील वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन रस्ते, चौकांची रचना, पार्किंग आणि परिसराचे सौंदर्यीकरण यांचा समावेश असलेला दीर्घकालीन विकास आराखडाही तयार केला जाणार आहे. हा आराखडा पुढील 2 महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश आहेत.
वाहतूक कोंडीच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाणे निश्चित करून तेथे विशेष उपाययोजना केल्या जातील. गर्दीच्या भागात पार्किंग आणि नो-पार्किंग नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे.
खासगी वाहनांचा वापर कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक आणि बससेवा मजबूत करण्यावरही प्रशासनाचा भर राहणार आहे. या बैठकीला आमदार बाबाजी काळे, एमआयडीसीचे मुख्य अभियंता के. एस. भंडारकर, प्रादेशिक अधिकारी अर्चना पाथरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.






