सासवड: पुरंदर तालुक्यातील खळद येथील गोटेमाळ (Purandar News) परिसरात 14 फेब्रुवारीला रक्ताच्या थारोळ्यात सापडलेल्या त्या अज्ञात तरुणाचा मृत्यू हा अपघात नसून, थंड डोक्याने केलेला ‘क्रूर खून’ असल्याचे आता पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. सुरुवातीला हा नैसर्गिक मृत्यू वाटणाऱ्या या घटनेने आता गुन्हेगारी वळण घेतल्याने संपूर्ण सासवड परिसरात खळबळ उडाली आहे.

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी, 33 वर्षीय मिश्रीलाल छोटेलाल (रा. उन्नाव, उत्तर प्रदेश) हा तरुण विवस्त्र आणि गंभीर जखमी अवस्थेत दगडांच्या ढिगाऱ्यात सापडला होता. सासवड पोलिसांनी त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले, मात्र आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 22 फेब्रुवारीला त्याचा प्राण गेला. 6 मार्च रोजी प्राप्त झालेल्या शवविच्छेदन अहवालाने (Post-Mortem) पोलिसांनाही धक्का दिला. मिश्रीलालच्या डोक्यावर वर्मी घाव घालून त्याची हत्या करण्यात आली होती.
गुन्हेगारांनी केवळ हत्या केली नाही, तर ओळख पटू नये म्हणून त्याला विवस्त्र केले आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह दगडांच्या ढिगाऱ्यात लपवला. हा अपघात नसून पूर्वनियोजित कट असण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.







