Pune ZP Election: पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार मोनाली अमोल लांडे यांच्या विजयानंतर आनंदाला उधाण आले. या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे यांनी अनोख्या पद्धतीने आनंद साजरा केल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. त्यांनी केवळ लंगोट परिधान करून नाचत आणि हातात राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांचा फोटो धरून हा विजय साजरा केला.

मोनाली लांडे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांचा पराभव करून यश मिळवले. त्यांच्या विजयानंतर कुटुंबीय, समर्थक आणि पक्ष कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. देवराम लांडे यांनी व्यक्त केलेला हा आनंद सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची मतमोजणी सोमवारी सकाळी 10 वाजता सुरू झाली. 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे निकाल हळूहळू समोर येत आहेत. प्राथमिक कलानुसार पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळत असल्याचे दिसत आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, दुपारी 2 वाजेपर्यंत भाजप 200 जागांवर, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना 137 जागांवर आघाडीवर असल्याचे वृत्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेस 120, काँग्रेस 46, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट 33, राष्ट्रवादी सपा 13 आणि इतर पक्ष 29 जागांवर पुढे आहेत.
या निवडणुकीसाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये मतदान झाले होते. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 2624 तर पंचायत समिती निवडणुकीसाठी 4814 उमेदवार रिंगणात होते. निकालांमुळे राज्याच्या राजकारणात नवी समीकरणे तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






