Pune Weather : पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सतत बदल दिसून येत आहे. दोन दिवसांपासून कमी होत असलेल्या किमान तापमानात 27 फेब्रुवारी रोजी 2 ते 3 अंशांनी वाढ झाली. त्यामुळे पहाटे जाणवणारा गारवा कमी झाला आहे. सकाळी थंडी कमी असली तरी दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढल्याचे जाणवत आहे. लोहगाव येथे 35 अंश सेल्सिअस इतके सर्वाधिक कमाल तापमान नोंदवले गेले. Pune Weather Updates

याआधी शिरूर, कुरवंडे, एनडीए आणि हवेली परिसरात किमान तापमान 8 अंशांपर्यंत खाली आले होते. त्यामुळे सकाळच्या वेळी चांगलीच थंडी जाणवत होती. मात्र आता तापमान वाढल्याने वातावरणात उब वाढली आहे. शहरात किमान तापमान 11 ते 12 अंशांच्या पुढे गेले आहे. दुपारी उन्हाचा तडाखा अधिक जाणवत असून नागरिकांना उकाड्याची जाणीव होत आहे.
फेब्रुवारी महिन्यातच तापमान वाढू लागल्याने यंदाचा उन्हाळा तीव्र राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लोहगावनंतर शिवाजीनगर, कोरेगाव पार्क आणि हवेली भागातही कमाल तापमान 32 ते 33 अंशांच्या आसपास नोंदवले गेले. गेल्या आठवड्यात ऊन, ढगाळ वातावरण आणि थंडी असा बदलता माहोल पाहायला मिळाला.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 2 दिवस आकाश स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. त्यानंतर कमाल तापमानात थोडी वाढ होऊ शकते. बदलत्या हवामानामुळे आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.





