पुणे: पिंपरी चिंचवड (Pune News) शहराच्या रस्त्यांवर वाढत्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक बेशिस्त होत असल्याचे चित्र नेहमीच पाहायला मिळते. मात्र सांगवी येथील रक्षक चौकात घडलेल्या एका घटनेने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या चौकात वाहतूक कोंडीतून वाचण्यासाठी अनेक दुचाकीस्वार फुटपाथचा वापर करत होते. हा प्रकार पाहून तिथे उपस्थित असलेल्या काही परदेशी नागरिकांनी संताप व्यक्त केला आणि या बेशिस्त चालकांना भररस्त्यात अडवून शिस्तीचे धडे दिले. या परदेशी पाहुण्यांनी थेट रस्त्यावर उतरून दुचाकीस्वारांना फुटपाथवरून खाली उतरण्यास भाग पाडले, ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:
— Naresh Shende (@NareshShen87640) December 18, 2025
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये असे दिसते की, हे परदेशी नागरिक अत्यंत शांतपणे पण ठाम भूमिकेत उभे आहेत. त्यांनी दुचाकीस्वारांना समज दिली की फुटपाथ हा केवळ चालण्यासाठी असतो, गाड्या चालवण्यासाठी नाही. विदेशी नागरिकांचा हा आक्रमक पण शिस्तप्रिय पवित्रा पाहून अनेक वाहनचालकांची चांगलीच धांदल उडाली आणि त्यांनी निमूटपणे आपल्या गाड्या मुख्य रस्त्यावर घेतल्या.
सोशल मीडियावर हा प्रकार समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी वाहनचालकांवर जोरदार टीका केली आहे. पोलिसांना दोष देण्यापेक्षा नागरिकांनी स्वतःहून नागरी शिस्त पाळली, तर अनेक अपघात टळतील.







