पुणे: पुण्यात (Pune News) भक्ती दर्शन टूर्सच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना लुटणारा एजंट योगेश देशमुख याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. स्वस्त दरात चारधाम यात्रा घडवतो असे सांगून या बहाद्दराने ५३ प्रवाशांकडून लाखो रुपये उकळले. आनंद हास्य क्लबमधील सदस्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर सांगवी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आरोपीने या लोकांकडून सहलीच्या नावाखाली ११ लाख ८५ हजार रुपये घेतले आणि त्यानंतर सर्वांची फसवणूक केली.

या प्रकरणाचा तपास करताना असे समोर आले की, आरोपीने सहलीसाठी एकूण ५४ जणांची नोंदणी केली होती. त्यापैकी २८ जणांना तो यात्रेसाठी घेऊन गेला खरा, पण तिथे गेल्यावर त्यांना कोणत्याही सोयीसुविधा दिल्या नाहीत. हेलिकॉप्टर प्रवासाचे वेगळे १५ हजार रुपये घेऊनही प्रवाशांना पायीच फिरावे लागले. नोव्हेंबर २०२३ पासून ही फसवणूक सुरू होती, जी २५ डिसेंबर २०२५ पर्यंत सुरू राहिली. ज्या २६ लोकांना यात्रेला नेलेच नव्हते, त्यापैकी २१ जणांचे पैसे त्याने पूर्णपणे हडप केले आहेत.
राजेंद्रनाथ जस्ताल यांनी या फसवणुकीबाबत पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. आरोपीने ५ जणांचे पैसे परत करून इतरांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र २१ लोकांचे पैसे आणि हेलिकॉप्टरसाठी घेतलेले पैसे असा मोठा आकडा त्याने स्वत:कडेच ठेवला. पैसे मागितल्यावर तो टाळाटाळ करू लागल्याने फसवणूक झाल्याचे ज्येष्ठ नागरिकांच्या लक्षात आले. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून अशा प्रकारे अन्य कोणाची फसवणूक झाली आहे का, याचा शोध घेत आहेत.






