पुणे: ‘पुणे मेट्रो’च्या नावाचा वापर (Pune News) करून एका दाम्पत्याला कोट्यवधी रुपयांचा चुना लावल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. मेट्रोच्या कामासाठी सिमेंट आणि पोलाद पुरवठा करण्याच्या व्यवसायात मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून एका दाम्पत्याची तब्बल 3 कोटी 78 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून शहरात एकच खळबळ उडाली आहे.

2020 मध्ये मांजरी परिसरात राहणाऱ्या एका 42 वर्षीय महिलेची ओळख संतोष सुरेश काकडे (लोणी काळभोर) आणि अतुल शामराव पवार (एरंडवणे) या दोघांशी झाली. आरोपींनी विश्वास संपादन करण्यासाठी “पुणे मेट्रोचं कंत्राट आमच्याकडे आहे, तिथे पोलाद आणि सिमेंटच्या पुरवठ्यासाठी गुंतवणूक केल्यास अल्पावधीत मालामाल व्हाल,” असे स्वप्न दाखवले.
मेट्रोसारख्या मोठ्या प्रकल्पाचे नाव असल्याने फिर्यादी दाम्पत्याने विश्वास ठेवला आणि वेळोवेळी 3 कोटी 78 लाख रुपये गुंतवले. मात्र, चार वर्षे उलटूनही ना नफा मिळाला, ना मुद्दल परत आली.
जेव्हा फिर्यादी महिलेने आपल्या हक्काच्या पैशांसाठी तगादा लावला, तेव्हा आरोपींनी दाम्पत्याला शिवीगाळ केली आणि थेट “तुमच्यावर सावकारीचा खोटा गुन्हा दाखल करू,” अशी धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने पोलिसांकडे धाव घेत गुन्हा दाखल केला आहे.






