Pune News: राजगड : राजगड (वेल्हे) दि. २० डिसेंबर रोजी गुंजवणी नदीवरील पूल कोसळल्यानंतर राजगड–वेल्हे परिसरातील २५ गावांचा संपर्क पूर्णतः तुटला. दळणवळण ठप्प झाले, रुग्णवाहिकांचा मार्ग बंद पडला, शाळकरी विद्यार्थ्यांचे शिक्षण विस्कळीत झाले, तर व्यापारी व शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान सुरू झाले. अशा गंभीर स्थितीत तातडीच्या उपाययोजनांची अपेक्षा असताना, निर्णय प्रक्रियेतील विलंबामुळे नागरिकांचे हाल वाढत गेले.

अखेर “प्रशासन थांबलं, पण जनता थांबली नाही” हे वास्तव पुन्हा एकदा पुढे आले. दि. ९ जानेवारी रोजी परिसरातील तरुण युवकांनी पुढाकार घेत लोकवर्गणीच्या व स्वखर्चाच्या जोरावर पर्यायी पूल व रस्ता उभारला आणि पंचवीस गावांचा तुटलेला जीवनवाहिनी संपर्क पुन्हा सुरू केला. मोरी, दगड, माती व मुरूम टाकून हा मार्ग रहदारीसाठी सुरक्षित करण्यात आला. हा रस्ता केवळ स्थानिकांसाठीच नव्हे, तर दोन्ही तालुक्यांना जोडणारा, व्यापार, पर्यटन व आपत्कालीन सेवांसाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरतो.
उपस्थिती व मार्गदर्शन
या लोकाभिमुख उपक्रमावेळी मा. श्री. निवासजी ढाणे (तहसीलदार, राजगड तालुका) आणि मा. किशोर शेवते (सहायक पोलिस निरीक्षक, वेल्हे) यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मार्गदर्शन व सहकार्य केले. आरसीसी मोरीसाठी प्रकाश शेठ वाढे यांचे मोलाचे योगदान लाभले.

पुढाकार घेणारे व संकल्पना
या कामासाठी भाऊसाहेब दसवडकर (सरपंच, आसकवडी), सुमित शिळीमकर (कोदवडी), टिल्लू वालगुडे (मार्गसनी) यांच्यासह अनेक तरुणांनी पुढाकार घेतला.
संकल्पना: भाऊसाहेब दसवडकर, तानाजी टिल्लू वालगुडे, सुमित शिळीमकर.
लोकवर्गणी व देणगीदार
या उपक्रमासाठी मंत्रा रिसॉर्ट, अतुल शेठ हिवाळे, दिनकर घरपाळे, तानाजी बाप्पू मांगडे, संतोषभाऊ रेणुसे, दिगंबर चोरघे, सतीश चव्हाण, दत्ता पानसरे, मुकुंद दंडवते, कुंभारकर साहेब, तनपुरे साहेब, राठोड साहेब, इंगूळकर साहेब, शिंदे साहेब, कुलकर्णी साहेब, रायकर साहेब, वर्धवन साहेब यांनी आर्थिक सहकार्य केले.
यंत्रसामग्रीचे सहकार्य
शिवाजी चोरघे (JCB/डंपर – २ दिवस), गणेश आलगुडे (डंपर – १ दिवस), मनोज शिळीमकर (डंपर – १ दिवस), पप्पू जगताप (डंपर – १ दिवस), निखिल मराठे (JCB – १ दिवस), टिल्लू वालगुडे (JCB – ४ दिवस), महिंद्र दसवडकर (डंपर – २ दिवस), अशोक सरपाले (डंपर – १ दिवस) यांनी विनामूल्य मदत पुरवली.
लोकशक्तीचा आदर्श, प्रशासनास प्रश्न
या पर्यायी पुलामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी हा कायमस्वरूपी उपाय नाही. प्रत्येक पावसाळ्यात धोका पुन्हा उभा राहू शकतो. त्यामुळे “कौतुकाचे शब्द नकोत—कायमस्वरूपी पूल हवा” अशी एकमुखी मागणी नागरिकांकडून होत आहे.
आज तरुणांनी स्वखर्चातून माणुसकीचा पूल उभा केला. उद्या प्रशासन जबाबदारीचा पूल उभारणार का? हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरितच आहे.




