पुणे: पुण्यातील कोंढवा (Pune Crime) परिसरातील पिसोळीमध्ये एका नायजेरियन तरुणाची त्याच्याच मित्रांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येमेका क्रिस्टीएन (वय 40) असे मृत तरुणाचे नाव असून तो मूळचा नायजेरियाचा होता आणि सध्या फुरसुंगी येथे राहत होता. ही घटना काल रात्री घडली.

जेवण सुरू असतानाच जुन्या प्रेमप्रकरणाच्या वादावरून ख्रिश्चन आणि त्याच्या मित्रांमध्ये जोरदार भांडण झाले. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन त्याच्याच 4 मित्रांनी येमेकाला बेदम मारहाण केली.
जखमी झालेल्या ख्रिश्चनला उपचारासाठी वानवडीतील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले.
पोलिसांनी तातडीने नायेमेका मदुबची ओनिया आणि किन्सली ओबा या दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. फरार असलेल्या इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तैनात केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.







