पुणे: पुण्यातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. चंदननगर परिसरात नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय पायल किशोर राजगुरू या तरुणीने ‘रूममेट्स’कडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली. अवघ्या 19 व्या वर्षी काही तरी मोठं करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मुलीचा असा अंत झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मूळची मुळशीची असलेली पायल पुण्यात नर्सिंगचा कोर्स करत होती. विठ्ठलनगरमधील एका इमारतीत ती तीन मैत्रिणींसोबत पेइंग गेस्ट (PG) म्हणून राहत होती. काही दिवसांपूर्वी तिच्या रूममधील सबुरी, शिवानी आणि दीपाली या तरुणींचे पैसे, पर्स आणि मोबाईल चोरीला गेले. या चोरीचा संशय या तिघींनी थेट पायलवर घेतला. पायलने वारंवार नकार देऊनही तिला ‘चोर’ ठरवून तिचा मानसिक छळ सुरू करण्यात आला.
केवळ संशयावरून हे प्रकरण थांबले नाही, तर या तरुणींनी पायलला सामाजिक स्तरावर बदनाम करण्याची धमकी दिली. ही चोरीची बाब कॉलेजमध्ये आणि ओळखीच्या लोकांमध्ये पसरवण्याची दहशत तिला दाखवण्यात आली. “कोणी आपल्यावर विश्वास ठेवणार नाही” या धास्तीने पायल खचून गेली. अखेर, 9 मार्च रोजी तिने सुसाईड नोट लिहून टोकाचे पाऊल उचलले.







