पुणे: पुणे (Pune News) शहरातील महिलांच्या सुरक्षेबाबत एक अतिशय दिलासादायक माहिती समोर आली असून गेल्या 5 वर्षात प्रथमच महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये घट पाहायला मिळाली आहे. पुणे पोलीस दलाने नुकतीच 2025 सालातील गुन्हेगारीची आकडेवारी जाहीर केली आहे. या माहितीनुसार शहरात बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यांचे प्रमाण 2024 च्या तुलनेत कमी झाले आहे. गेल्या 4 वर्षांपासून हा आलेख सातत्याने वर जात होता, मात्र 2025 मध्ये प्रथमच हा वाढता वेग रोखण्यात पोलिसांना यश आले आहे.

आकडेवारीवर नजर टाकली तर असे दिसून येते की, 2024 मध्ये शहरात बलात्काराच्या 499 घटनांची नोंद झाली होती, जी 2025 मध्ये 473 आहे. तसेच विनयभंगाच्या प्रकरणांमध्येही घट झाली असून 844 वरून हा आकडा 836 वर पोहोचला आहे.
येथे पाहा आकडेवारी
वर्ष : 2021 बलात्काराच्या घटना : 283 विनयभंगाच्या घटना : 382
वर्ष : 2024 (सर्वोच्च पातळी) बलात्काराच्या घटना : 499 विनयभंगाच्या घटना : 844
वर्ष : 2025 (ताज्या नोंदी) बलात्काराच्या घटना : 473 विनयभंगाच्या घटना : 836
पुणे पोलिसांच्या महिला सुरक्षा कक्षाने राबवलेले विविध उपक्रम आणि प्रभावी कामगिरीमुळे ही परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना 2025 मध्ये मिळालेला हा ब्रेक भविष्यातील सुरक्षित पुण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.







