पुणे: पुणे (Pune News) शहरामध्ये घरफोडी करणाऱ्या टोळ्यांनी उच्छाद मांडला असून तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये सुमारे 53 लाख रुपयांची लूट झाली आहे. वाघोली, नवी पेठ आणि शिवणे या भागांतील बंद घरांना चोरट्यांनी आपले लक्ष्य बनवले. वाघोली येथील स्टार सिटी सोसायटीमध्ये चोरट्यांनी बंद घर फोडून कपाटातील 12 लाख 32 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. नवी पेठ येथील नवले पथ भागातही चोरट्यांनी एका बैठ्या घराचे टाळे तोडून 1 लाख 62 हजार रुपयांचे दागिने पळवले आहेत. या प्रकरणाचा तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.

शिवणे येथील एनडीए रोडवरील लक्ष्मी शांतिबन सोसायटीत सर्वात मोठी चोरी झाली आहे. या ठिकाणी एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल 39 लाख 30 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पळवून नेले. या प्रकरणी उत्तमनगर पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेत आहेत.
या वाढत्या गुन्ह्यांनंतर पोलिसांनी पुणेकरांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. या सर्व चोऱ्यांमध्ये एखाद्या टोळीचा हात असू शकतो, अशी शंका व्यक्त करत पोलीस कसून तपास करत आहेत.







