पुणे, ता. 05 : रेल्वेने प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दौंड–मनमाड रेल्वे (Pune News) मार्गावर दुहेरीकरणाचे काम सुरू करण्यात येणार असून, या कामासाठी दौंड ते काष्टी स्थानकांदरम्यान 15 ते 25 जानेवारीदरम्यान विशेष मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्यातून धावणाऱ्या अनेक प्रवासी गाड्यांवर परिणाम होणार आहे.

रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या कालावधीत प्री-नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामे केली जाणार आहेत. यासाठी ट्रॅफिक आणि वीजपुरवठा ब्लॉक घेतला जाणार असून, पुणे–सोलापूर तसेच पुणे–अमरावती मार्गावरील रेल्वे सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत होणार आहे.
मेगा ब्लॉकच्या काळात पुणे–सोलापूर एक्स्प्रेस, सोलापूर–पुणे एक्स्प्रेस, सोलापूर–पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस, पुणे–सोलापूर डीईएमयू, सोलापूर–पुणे डीईएमयू आणि पुणे–दौंड डीईएमयू या गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय काही गाड्या अर्ध्या मार्गापर्यंतच धावणार आहेत. इंदूर–दौंड आणि ग्वाल्हेर–दौंड एक्स्प्रेस या गाड्या दौंडऐवजी खडकी स्थानकापर्यंतच चालवण्यात येणार आहेत.
दरम्यान, प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना रेल्वेचे अद्ययावत वेळापत्रक तपासावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.







