पुणे: पुणे जिल्ह्यातील मोरगावमध्ये (Pune News) बुधवारी सकाळच्या सुमारास एका सुन्न करणाऱ्या घटनेने खळबळ उडाली. मोरगाव पोलीस मदत केंद्राच्या अगदी समोर, एका अज्ञात तरुणाने समोरून येणाऱ्या भरधाव टेम्पोच्या चाकाखाली स्वतःला झोकून देत आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना इतकी अनपेक्षित होती की, कोणालाही काही समजण्याच्या आत त्या तरुणाचा जागीच अंत झाला.

सकाळचे सात ते आठ वाजले होते, सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलेल्या माहितीनुसार, हा तरुण रस्त्याकडेला असलेल्या एका दुकानाच्या पायरीवर शांतपणे बसलेला होता. मात्र, समोरून एक अवजड टेम्पो येताना दिसताच, त्याने अचानक उठून रस्त्याच्या दिशेने धाव घेतली आणि थेट टेम्पोच्या मागील चाकाखाली स्वतःला झोकून दिले. चालकाने ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत उशीर झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, हा तरुण स्थानिक नसून कदाचित परजिल्ह्यातून येथे आला असावा. त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले? तो कोणत्या मानसिक दडपणाखाली होता? की कौटुंबिक कलहातून त्याने हे केले? या प्रश्नांची उत्तरे अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, पोलिस अधिक तपास करत आहेत.







