पुणे, ता. 25: पुणे (Pune News) शहरातील रस्त्यांवर पोलिसांचे अस्तित्व वाढविण्यासाठी व नागरिकांना जलद मदत पुरविण्यासाठी शहर पोलिसांकडून ‘कॉप 24 ’ हा उपक्रम 15 फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. त्यानुसार आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल 726 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून ते 24 तास गस्त घालत आहे. परंतु, ‘कॉप 24 ’चे पोलिस मदत करण्यासाठी पोहचल्यानंतर त्यांच्या गणवेशातील भिन्नतेमुळे नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण होऊ लागला आहे.

नागरिक पोलिस प्रशासनाची मदत मिळावी म्हणून 112 या क्रमांकावर फोन करत होते. त्यावेळी पोलिस खाकी गणवेशात आल्यानंतर नागरिकांना पोलीस मदतीसाठी आल्याचे समजत होते. परंतु आता ‘कॉप 24 ’चे पोलिस मदत करण्यासाठी पोहचल्यानंतर त्यांच्या अंगातील गणवेश नेव्ही ब्लू असल्यामुळे काही नागरिकांना ते वनविभागाचे कर्मचारी, खाजगी सुरक्षा रक्षक, सैन्य दलातील कमांडो तर काहींना बिबट्या पकडणारी रेस्क्यू टीम आल्याचे असे वेगवेगळे संभ्रम निर्माण होत आहे.
पुणे शहर पोलिसांकडून ‘बीट मार्शल ही संकल्पना गेल्या अनेक वर्षांपासून राबविण्यात येत आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन-दोन कर्मचारी दोन सत्रांत गस्त घालतात. रस्त्यावरील गुन्हेगारी कमी करणे, एखादा गुन्हा घडल्यानंतर तत्काळ मदत करणे आणि समाजात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करणे आदी उद्देशांतून ‘बीट मार्शल’ ही संकल्पना राबविली जात होती. मात्र, सध्या तीच संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी ‘कॉप २४’ हा उपक्रम चालू केला आहे.
दरम्यान, भारतातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची राज्यांची जबाबदारी आहे, त्यामुळे प्रत्येक राज्याच्या पोलिसांचा गणवेश थोडा वेगळा असू शकतो. परंतु, गणवेशातील भिन्नतेमुळे नागरिकांमध्ये खूपच गैरसमज होऊ लागले आहेत. तर काही ठिकाणी पोलीस पोहचल्यानंतर बिबट्या पकडणारी रेस्क्यू टीम आल्याचे वाटत असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. परंतु, काही वेळानंतर ते पोलीस असल्याचे समजल्यानंतर नागरिक सुटकेचा निश्वास सोडतात.
गोंधळ टाळण्यासाठी उपाय
पोलीस प्रशासनाकडून ‘कॉप 24 ’ पोलीस गणवेशाचे नियम आणि त्याचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनजागृती करावी. शक्य असेल तिथे गणवेशाची समानता राखण्याचा प्रयत्न करावा. पोलिसांच्या गणवेशाबद्दलची अधिकृत माहिती आणि नियम नागरिकांपर्यंत पोहोचवावे. तरच नागरिकांमधील गोंधळ टळेल. अन्यथा नागरिक कायमस्वरूपी संभ्रमातच राहतील.
काही दिवसापूर्वी आमच्या परिसरात किरकोळ कारणावरून वादावादीची घटना घडली होती. त्यावेळी पोलिसांच्या मदत कक्षाला फोन केला होता. काही वेळातच दुचाकीवर दोघेजण आले. परंतु, गणवेशातील भिन्नतेमुळे आम्हाला ते पोलीस असल्याचे लवकर समजले नाही. त्यांनी ओळख करून दिल्यानंतर आम्हाला ते पोलीस असल्याची खात्री पटली. त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी घडलेली हकीकत सांगितली.
अनिता गायकवाड (गृहिणी, पुणे)
नागरिकांना पोलीस प्रशासनाची मदत त्वरित मिळावी म्हणू ‘कॉप 24 ’हा उपक्रम पोलीस प्रशासनाकडून राबविण्यात येत आहे. परंतु, ड्रेसकोड मुळे गैरसमज होत असेल तर ‘कॉप 24 ’चा ड्रेसकोड बदलण्याचा विचार करू.
डॉ. राजकुमार शिंदे (पोलीस उपायुक्त, पुणे शहर)






