पुणे: पुण्यातील (Pune News) बाजारपेठेत सध्या भाजीपाल्याची मोठी आवक होत असल्याचे चित्र दिसत आहे. गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी राज्याच्या विविध भागांतून तसेच इतर राज्यांतून मिळून सुमारे 100 ट्रक माल दाखल झाला. कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशातून मिरची, कोबी, मटार आणि बटाट्याचा मोठा पुरवठा झाला आहे. विशेष म्हणजे बाजारात मालाचा फ्लो वाढलेला असूनही मागणी चांगली असल्याने बहुतांश भाज्यांचे दर स्थिर आहेत. मात्र कांद्याच्या बाबतीत ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून त्याच्या किमतीत घट झाली आहे. मागणी घटल्याने गेल्या आठवड्यात 18 ते 25 रुपयांना मिळणारा कांदा आता घाऊक बाजारात 12 ते 18 रुपयांपर्यंत खाली आला आहे.

पालेभाज्यांच्या विभागात मात्र आवक कमी झाल्याने काही भाज्या महागल्या आहेत. मागणी जास्त असल्याने कांदापात आणि मुळ्याच्या जुडीमागे 3 ते 5 रुपयांची वाढ झाली आहे. याउलट कोथिंबिरीची आवक दीड लाख जुड्यांपर्यंत खाली येऊनही मागणी नसल्याने त्याचे दर 5 रुपयांनी उतरले आहेत. सध्या चांगल्या दर्जाची कोथिंबीर 8 ते 15 रुपयांना मिळत आहे. पुदिना देखील 2 रुपयांनी स्वस्त झाला असून मेथीची आवक मात्र 1 लाख जुडीवर स्थिर आहे. तसेच बाजारात आता हरभरा गड्डीची नवीन आवक सुरू झाली असून त्याला 10 ते 15 रुपये भाव मिळत आहे.
स्थानिक शेतकऱ्यांकडूनही मोठ्या प्रमाणात टोमॅटो, भेंडी, गवार आणि आल्याचा पुरवठा होत आहे. एकट्या टोमॅटोचे 10 हजार क्रेट्स रविवारी मार्केटमध्ये आले. बटाट्याची आवक आग्रा आणि इंदूर भागातून सुमारे 60 टेम्पो इतकी झाली आहे. लसणाचे दर आणि आवक सध्या नियमित असून मध्य प्रदेशातून 10 टेम्पो लसूण दाखल झाला आहे. भाजीपाल्याची एकूण उपलब्धता पाहता कांदा आणि कोथिंबीर वगळता इतर भाज्यांचे दर येत्या काही दिवसांत स्थिर राहतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.







