सागर जगदाळे

भिगवण: पुणे-सोलापूर महामार्गावर भिगवण (Pune News) येथील ‘बिल्ट’ कंपनीच्या मटेरियल गेटजवळ मध्यरात्री एका धावत्या वोल्वो कारने अचानक पेट घेतला. रात्री साधारण एक वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. प्राथमिक अंदाजानुसार, तांत्रिक बिघाडामुळे (Short Circuit) ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रात्री एकच्या सुमारास कार मटेरियल गेटजवळून जात असताना इंजिनमधून धूर निघू लागला आणि काही क्षणातच कारने पेट घेतला. आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखून गाडी बाजूला उभी केली आणि बाहेर उडी घेतली, ज्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका आणि भिगवण पोलीस स्टेशनचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच, अग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.
या भीषण आगीत कारचे प्रचंड नुकसान झाले असून गाडीचा सांगाडाच उरला आहे. सुदैवाने, या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. आगीचे नेमके तांत्रिक कारण शोधण्यासाठी भिगवण पोलीस पुढील तपास करत आहेत.







