पुणे: क्रिकेटच्या मैदानावरील सर्वात मोठा थरार (IND vs PAK) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यात भारताने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. टी-20 विश्वचषक 2026 च्या या महामुकाबल्यात सूर्यकुमार यादवच्या टीमने पाकिस्तानचा 61 धावांनी धुव्वा उडवत त्यांना धूळ चारली आहे. या विजयासह भारताने स्पर्धेच्या ‘सुपर-8’ फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारताची सुरुवात खराब झाली होती. अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाल्याने भारतीय चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता. मात्र, मैदानात आलेल्या इशान किशनने पाकिस्तानी गोलंदाजांना हैराण केले. इशानच्या या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तानची रणनीती पूर्णपणे कोलमडली. मधल्या फळीत सूर्यकुमार यादव आणि शेवटच्या षटकांत शिवम दुबे व रिंकू सिंग यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने पाकिस्तानसमोर 175 धावांचे डोंगरासारखे आव्हान उभे केले.
176 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या फलंदाजांनी भारतीय माऱ्यासमोर ‘नांगी’ टाकली. उस्मान खानच्या 44 धावांचा अपवाद वगळता पाकिस्तानचा एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरू शकला नाही आणि संपूर्ण संघ 114 धावांवर गारद झाला.







