Pune Manmad Train : पुणे : पुणे ते मनमाड या अतिशय वर्दळीच्या रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. या मार्गावरील सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि गाड्यांचा वेग सुधारण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नवीन आणि उच्च दर्जाचे रूळ टाकण्याचे काम सुरू केले आहे. या नव्या रुळांची क्षमता 550 जीएमटी इतकी असून ते सुमारे 55 कोटी टन वजनाचा भार सहन करू शकतात. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह होणार आहे.

पुणे रेल्वे विभागात पुणतांबा ते कन्हेगाव स्थानकांदरम्यान हे काम सध्या वेगाने सुरू आहे. या ठिकाणी पीक्यूआरएस म्हणजेच प्लेसर क्विक रिलेइंग सिस्टीम या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे रेल्वे वाहतूक सुरू ठेवत ठराविक वेळेचे ब्लॉक घेऊन हे काम केले जात आहे. अवघ्या 35 दिवसांत सुमारे 9 किलोमीटर अंतरावरील जुने रूळ काढून नवीन रूळ बसवण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले आहे.
या सुधारणा पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना अनेक फायदे मिळणार आहेत. यापूर्वी या मार्गावर 52 किलो वजनाचे रूळ वापरण्यात येत होते. आता त्याठिकाणी 60 किलो वजनाचे अधिक मजबूत आणि टिकाऊ रूळ बसवण्यात आले आहेत. त्यामुळे गाड्यांचा वेग वाढवणे शक्य होणार आहे. सध्या या मार्गावरील गाड्यांचा सरासरी वेग ताशी 110 किलोमीटर इतका आहे, तो भविष्यात 130 किलोमीटरपर्यंत वाढवता येणार आहे. यामुळे पुणे ते मनमाड दरम्यानचा प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होईल.
तसेच, अल्ट्रासॉनिक टेस्टिंगसारख्या आधुनिक तपासणी पद्धतींचा वापर केल्याने रुळांमध्ये येणारे तडे वेळेत लक्षात येतील. यामुळे रुळ तुटण्यामुळे होणाऱ्या अपघातांचा धोका कमी होणार आहे. अवजड मालगाड्यांच्या वाहतुकीमुळे होणारे नुकसानही यामुळे टाळता येणार आहे. एकदा हे नवीन रूळ पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर पुढील 15 ते 20 वर्षे या मार्गावर पुन्हा रूळ बदलण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे देखभालीसाठी लागणारा वेळ वाचेल आणि रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक अधिक नियमित राहण्यास मदत होईल.







