न्हावरे: न्हावरे (ता. शिरूर) येथील सुनिल लक्ष्मण जाधव (वय 45) यांचे अर्धांगवायूचा तीव्र झटका आल्याने नुकतेच निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने न्हावरे परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार असून, सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव यांचे ते बंधू होत. (Pune News)

सुनिल जाधव यांना उपचारासाठी पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड घोषित केले. हा क्षण कुटुंबासाठी अत्यंत वेदनादायक असतानाही, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि सामाजिक जाणिवेतून जाधव कुटुंबियांनी एक अत्यंत मोठा आणि प्रेरणादायी निर्णय घेतला. त्यांनी सुनिल जाधव यांचे अवयवदान करण्यास संमती दिली.
या निर्णयामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. स्वतःच्या दुःखावर मात करत, दुसऱ्यांचे जीवन वाचवण्याचा हा निर्णय खऱ्या अर्थाने माणुसकी जपणारा ठरला आहे. अवयवदानानंतर सुनिल जाधव यांना शासकीय इतमामात अखेरची मानवंदना देण्यात आली. त्या वेळी उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू होते, तर मनात अभिमानाची भावना होती.
सामाजिक चळवळीत सक्रिय असलेल्या सुनिल जाधव यांचा असा करुणामय अंत झाला असला, तरी मृत्यूनंतरही त्यांनी समाजासाठी योगदान दिले, अशी भावना परिसरातून व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी असली, तरी त्यांच्या अवयवदानाच्या निर्णयामुळे ते अनेकांच्या आयुष्यात कायम जिवंत राहतील, अशा शब्दांत नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.







