शिरूर: शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा गावात क्रिकेट स्पर्धेच्या बॅनरवरून फोटो छापण्यावरून झालेल्या वादातून मोठा राडा आणि गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे ग्रामीण पोलीस आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी कठोर कारवाई करत, परिसरातील वाढती गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी कुख्यात गुंड योगेश केशव मचाले आणि त्याच्या संपूर्ण संघटित गुन्हेगारी टोळीवर ‘मोक्का’ (MCOCA) कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे.

गेल्या १९ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मांडवगण फराटा येथील भैरवनाथ क्रिकेट मैदानावर हा थरार घडला होता. क्रिकेट स्पर्धेच्या अधिकृत बॅनरवर सूत्रधार लक्ष्मण शिंदे याचा फोटो लावल्याच्या कारणावरून दोन गटांत वाद पेटला होता. हा वाद मिटवण्यासाठी काही तरुण मध्यस्थी करायला गेले असता, आरोपींनी थेट पिस्तुलातून गोळीबार करत त्यांना जीवे मारण्याचा जीवघेणा प्रयत्न केला. या हल्ल्यामुळे परिसरात मोठी धावपळ उडाली आणि आरोपींनी दगडफेक करत सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरवली. याप्रकरणी मिथुन उर्फ अमोल चौगुले यांनी शिरूर पोलीस ठाण्यात धाव घेत सविस्तर फिर्याद नोंदवली होती.

पोलिसांनी या गुन्ह्याचा सखोल तपास केला असता, यात कुख्यात गुंड योगेश मचाले आणि त्याच्या टोळीचा थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत काही सदस्यांना यापूर्वीच बेड्या ठोकल्या असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, तर काही आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत. मात्र, या संपूर्ण गुन्हेगारी कटाचा मुख्य सूत्रधार असलेला योगेश मचाले हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. टोळीप्रमुख योगेश केशव मचाले हा फरार असून, अक्षय उर्फ ईश्वर गोविंदा पाटील, सूत्रधार लक्ष्मण शिंदे आणि पप्पू उर्फ सत्यम दत्तात्रय कड हे टोळीसदस्य सध्या अटकेत असून न्यायालयीन कोठडीत आहेत, तर ऋतिक बाळू चव्हाण आणि दिगंबर दशरथ शेंडकर हे दोघे आरोपी जामिनावर बाहेर आहेत.
या कुख्यात टोळीच्या नावावर खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, खंडणी आणि दरोड्यासारखे तब्बल २७ गंभीर गुन्हे नोंदवले गेलेले आहेत. त्यामुळे कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी पाठवलेल्या मोक्काच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाली असून, या प्रकरणाचा पुढील सविस्तर तपास शिरूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
ही धडाकेबाज कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल आणि पुणे विभागाचे अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिरूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक संदेश केंजळे आणि वर्तमान पोलीस निरीक्षक विनोद पाटील, तसेच पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार महेश बनकर व रामदास बाबर, तसेच शिरूर उपविभागाचे पोलीस अंमलदार हवालदार तुषार पंदारे, राजू मोमीन, जनार्दन शेळके, संजू जाधव आणि पोलीस कॉन्स्टेबल सागर धुमाळ यांनी विशेष सहकार्य केले. याशिवाय शिरूर पोलीस ठाण्याचे हवालदार परसराम सांगळे, नितीन सुद्रीक, राहुल भवर, शरद वारे आणि पोलीस कॉन्स्टेबल नीरज पिसाळ, सचिन भोई यांनी या संपूर्ण कारवाईमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत तपास यशस्वी केला.






