लोणी काळभोर, ता. 27: गर्दीच्या वेळी चार महिलांनी भररस्त्यात आरडाओरडा, शिवीगाळ आणि झोंबाझोंबी करत अक्षरशः धिंगाणा घातल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (Loni Kalbhor) (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील दत्त मंदिर चौकात मंगळवारी (ता.24) सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्याप्रकरणी चार जणांच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुनस अय्यु इराणी (वय 35), सीमु मोसन इराणी (वय 50),फातीमा मन्सुर जाफरीन (वय 50) व फिजा ऊर्फ मम्माई मोहंमद जाफरीन (वय 30 सर्व रा. पठारे वस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी महिला पोलीस अंमलदार माधुरी केरबा चौधरी यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरी चौधरी या 24 फेब्रुवारीला सकाळी 9 ते रात्री 9 या दिवसपाळीत ठाणे अंमलदार कक्षात फोन व वायरलेस ड्युटीवर होत्या. सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास दत्त मंदिर चौकाजवळ जोरजोरात आरडाओरडा होत असल्याची माहिती मिळताच, त्यांनी तत्काळ सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा चार महिला सार्वजनिक रस्त्यावर एकमेकींना शिवीगाळ करत झोंबाझोंबी करत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून भांडणे सोडवली.
प्राथमिक चौकशीत घराजवळील वादातून हा प्रकार सुरू झाल्याचे समोर आले. तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्याकडे येत असतानाच रस्त्यावरच पुन्हा वाद उफाळून आला आणि भरचौकातच महिलांनी एकमेकींवर शिवीगाळ करत मारामारी सुरू केली. या प्रकारामुळे काही काळ वाहतूक खोळंबली तसेच परिसरात नागरिकांची गर्दी जमली. सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी संबंधित चारही महिलांविरोधात भारतीय न्यायसंहिता कलम 194(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






