लोणी काळभोर, ता. 23 : कुंजीरवाडी व थेऊर (ता. हवेली) परिसरातील मंगल कार्यालयांमध्ये (Loni Kalbhor) सुरू असलेल्या दागिने चोरीच्या मालिकेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आता तर चोरट्यांनी सेवानिवृत्त पोलिसालाच लक्ष्य केल्याने दिसून येत आहे. कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील धनश्री लॉन्स या मंगल कार्यालयात गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी सेवानिवृत्त पोलिसाच्या गळ्यातील अडीज तोळ्याची साखळी 20 फेब्रुवारीला रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास लंपास केली आहे. लग्नसमारंभात वारंवार होत असलेल्या चोऱ्यांमुळे लोणी काळभोर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याप्रकरणी मारुती बाबुराव काळे (वय 71, रुपीनगर, बेकराईनगर, पुणे ) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळे हे 2013 साली पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी साधारण 20–25 वर्षांपूर्वी पुण्यातील सोन्यामारुती चौकातील मेहता ज्वेलर्स येथून अडीच तोळ्यांची सोन्याची साखळी खरेदी केली होती.
दरम्यान, कुंजीरवाडी येथील धनश्री लॉन्स येथे शेजाऱ्याच्या मुलाच्या लग्नासाठी काळे हे मित्रांसह 20 फेब्रुवारी रोजी गेले होते. सायंकाळी लग्न सोहळा पार पडल्यानंतर जेवणाच्या हॉलमध्ये मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे 1 लाख 50 हजार रुपये किंमतीची अडीच तोळ्यांची सोन्याची साखळी व ‘आर’ अक्षर असलेले पेंडंट लंपास केले. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर भारतीय न्याय संहिता कलम 303 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगल कार्यालये बनली चोरट्यांचे लक्ष्य
लोणी काळभोर सह परिसरात गेल्या काही महिन्यांपासून लग्नसमारंभात चोरीचे प्रकार वाढतच चालले आहेत. कुंजीरवाडी येथील एका मंगल कार्यालयात सुनेसाठी आणलेले तब्बल 7 लाख 50 हजार रुपयांचे दागिने चोरीला गेले होते. त्यानंतर दुसऱ्या घटनेत दोन जणांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांच्या सोन्याच्या चैन चोरट्यांनी लंपास केल्या. तसेच थेऊर परिसरातील एका मंगल कार्यालयातून सुमारे 14 लाख रुपयांचे दागिने व रोकड चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली होती. या मालिकेत आता सेवानिवृत्त पोलिसाचीच सोनसाखळी चोरीला गेल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
अवघ्या पंधरा दिवसांच्या कालावधीत तीन वेगवेगळ्या मंगल कार्यालयांतून तब्बल 25 लाख रुपयांहून अधिक किंमतीचे दागिने चोरीला गेले आहेत. तरीही या गुन्ह्यांचा छडा लावण्यात लोणी काळभोर पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. शहरात मोठी पोलीस यंत्रणा असतानाही चोरटे मात्र मोकाट फिरत असल्याचे चित्र दिसत आहे. परिसरात सतत घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून, “लग्नसमारंभालाही सुरक्षितता उरली नाही का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. पोलिसांनी तातडीने या चोरीच्या मालिकेचा छडा लावला नाही तर भविष्यात अशा घटनांमध्ये आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे.






