लोणी काळभोर, ता. 31 : चोरट्यांनी धाडसी चोरी (Loni Kalbhor) करत कपड्यांच्या दुकानाचे शटर उचकटून रोख रक्कम व महागडे कपडे असा 44 हजारांहून अधिक रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी स्टेशन (ता. हवेली) परिसरात घडली असून 28 मार्चला सकाळी उघडकीस आली आहे. सीसीटीव्हीमध्ये तिन संशयित युवक मोपेडवरून येत चोरी करून पळाल्याचे स्पष्ट दिसत आहे.

याप्रकरणी योगेश कुबीर लावंड (वय 27, रा. पांडवदंड, फुरसुंगी) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी योगेश लावंड यांचे लोणी स्टेशन चौकात हनुमान मंदिराजवळ “एकदंत कलेक्शन मेन्स वेअर” नावाचे कपड्यांचे दुकान आहे. या दुकानातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. फिर्यादी योगेश लावंड हे 27 मार्च रोजी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून लावंड घरी गेले होते.
दुसऱ्या दिवशी 28 मार्चला सकाळीसाडेसहा वाजता परिसरातील सनी काळभोर यांनी फोन करून दुकानाचे शटर उचकटले असल्याची माहिती दिली. तात्काळ दुकानात पोहोचल्यावर शटर जबरदस्तीने उघडल्याचे दिसून आले. त्यानंतर112 वर फोन करून पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस व फॉरेन्सिक पथकाच्या उपस्थितीत दुकानाची तपासणी केली असता काउंटरमधील ड्रॉव्हर उघडे आढळले आणि त्यातील 15 हजार रुपयांची रोख रक्कम गायब असल्याचे लक्षात आले.
दरम्यान, दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता 28 मार्च रोजी पहाटे 3.15 ते 3.23 या आठ मिनिटांच्या कालावधीत तीन युवक मोपेडवरून येऊन दुकानात घुसल्याचे आणि चोरी करून पसार झाल्याचे स्पष्ट दिसून आले. चोरट्यांनी रोख रकमेबरोबरच विविध ब्रँडचे शर्ट, टी-शर्ट व जीन्स असा मोठा मालही चोरून नेला. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305(अ) व 331 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
शेजारचे दुकानही फोडण्याचा प्रयत्न
याच परिसरातील “श्रीराम मेन्स वेअर” या दुसऱ्या दुकानाचेही शटर उचकटण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले. मात्र चोरट्यांना आत प्रवेश करता न आल्याने त्या दुकानातील चोरी टळली. त्यामुळे परिसरात चोरट्यांची टोळी सक्रिय असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.







