लोणी काळभोर, ता. 17: कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील (Loni Kalbhor News) संतश्रेष्ठ जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी तळावर एका विशिष्ट समाजातील नागरिकांनी खुलेआम अतिक्रमण करून वास्तव्य केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. मागील पंधरा दिवसांपासून या ठिकाणी संशयास्पद हालचाली सुरू असतानाही प्रशासनाने साधी विचारपूसही केली नाही. या प्रकरणी शिवसेना (शिंदे गट) पुणे जिल्हा संघटक निलेश काळभोर यांनी प्रशासनावर जोरदार टीका करत तात्काळ चौकशी व कडक कारवाईची मागणी केली आहे.

पुढे बोलताना निलेश काळभोर म्हणाले की, पालखी तळासारख्या पवित्र आणि ऐतिहासिक स्थळी बेकायदेशीरपणे लोक वास्तव्यास असताना प्रशासन पूर्णपणे गाफील राहणे हे अत्यंत धक्कादायक आहे. “हे नागरिक नेमके कोठून आले? त्यांच्या जवळ वैध ओळखपत्रे आहेत की नाहीत? त्यांची पार्श्वभूमी काय आहे? याची कसून चौकशी झाली पाहिजे. अन्यथा भविष्यात स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही,” असा थेट इशाराही त्यांनी दिला.
इतकेच नव्हे, तर या लोकांना येथे आश्रय कोणी दिला, कोणाच्या परवानगीने हे अतिक्रमण झाले, याचीही सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी. “प्रशासनाला नागरिकांच्या सुरक्षेशी काही देणेघेणे आहे की नाही? एखादी मोठी घटना घडल्यानंतरच जाग येणार का?” असा थेट सवालही काळभोर यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, लोणी काळभोर परिसरात प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, लवकरात लवकर अतिक्रमण हटवून दोषींवर कारवाई न झाल्यास शिवसेनेच्या वतीने आंदोलन घेडण्यात येणार आहे. असा इशारा निलेश काळभोर यांनी दिला आहे.
नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
स्थानिक नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालखी तळावर वाढणाऱ्या गर्दीमुळे परिसरातील महिलावर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. मात्र तरीही प्रशासनाकडून कुठलीही ठोस पावले उचलली जात नाहीत. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना प्रशासनाने डोळ्यावर पट्टी बांधल्याचा आरोप होत असून, आता प्रशासनाकडून पुढील पावले काय उचलली जातात? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
पालखी तळाच्या जागेची देखभाल व दुरुस्तीचे काम कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीकडे दिले आहे. या अतिक्रमणाबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. तरीही या बाबत माहिती घेऊन चौकशी करते.
तृप्ती कोलते (अपर तहसीलदार- लोणी काळभोर तहसील कार्यालय)






