लोणी काळभोर, ता. 19: नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवून लुटने, कोयत्याने वार करणे, परिसरात दहशत निर्माण करणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील गुंडाची मग्रूरी वाढली असून त्याचा वाढदिवस चक्क रस्ता अडवून रस्त्यावरच केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (ता.18) मध्यरात्री उघडकीस आला आहे. लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या काही तासाच्या आत 13 जणांना अटक केली आहे. तर तीन जण फरार झाले आहे. (LONI KALBHOR CRIME)

राज रविंद्र पवार, नटराज शिवाजी कदम, प्रेम तानाजी गायकवाड (सर्व रा. गुजरवस्ती कवडीपाठ टोलनाका कदमवाकवस्ती ता. हवेली जि. पुणे) प्रविण लक्ष्मण नाझीरकर (वय 21), ओम गणेश चव्हाण (वय 20), हर्षद नारायण चव्हाण (वय 21), आदित्य दादा गायकवाड (वय 19), अनिल मानसिंग होमणे (वय 30), हर्षल शंकर जगताप (वय 19 ), अनिकेत महेश जांभळे (वय 23), सनि जयवंत भोसले (वय 19), सौरभ संतोष मस्के (वय 19), अभिषेक महेश जांभळे (वय 25 ), महेश संपत नाझीरकर (वय 19), कृष्णा सुरेश आरण (वय 19, सर्व रा. जेजुरी ता. पुरदंर जि. पुणे), सुदाम गुलाब चव्हाण (वय 19 रा. वासुली फाटा, म्हाळुंगे चाकण ता. खेड जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राज पवार हा लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी वृत्तीमुळे कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे राज पवारला पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपारसुद्धा करण्यात आले होते.
दरम्यान, राज पवारचा गुरुवारी (ता.18) वाढदिवस होता. त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याचे अनेक मित्र कदमवाकवस्तीत आले होते. राज पवार व त्याच्या मित्रांनी यावेळी मोठा धांगडधिंगा घातला. व बेकायदेशीर जमाव जमवून वाहतुकीचा रस्ता अडविला. यावेळी राजपवारचा जयघोष करण्यात आला. तसेच हत्यार हवेत भिरकावून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात 16 जणांवर भारतीय न्याय संहीता कलम 126 (2),189(1), 189(2), 189 (4), भारतीय हत्यार कायदा कलम 4(25), महाराष्ट्र पोलीस अधि. 37(1) (2) (3) सह 135 क्रिमीनल अॅमॅटमेन्ट लॉ 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्काळ 13 जणांना अटक केली आहे. तर तीन जणांना पोलीस आल्याची चाहूल लागताच, घटनास्थळावरून पळून गेले आहेत. फरार झालेल्या आरोपींना पकडण्यासाठी लोणी काळभोर पोलिसांचे पथके आरोपींच्या मागावर आहेत.







