Mumbai : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जागावाटपावरून जोरदार खल सुरू आहे. या चर्चेत भाजपने शिंदे गटाला अपेक्षेपेक्षा खूपच कमी जागा देऊ केल्याने तणाव वाढला आहे. शिंदे गटाने तब्बल १२५ जागांची मागणी केली होती, मात्र भाजपने पहिल्याच बैठकीत फक्त ५२ जागांची ऑफर दिल्याची माहिती आहे. उर्वरित जागांवर शिंदे गटाने केलेले दावे भाजपने फेटाळल्याने अस्वस्थता वाढली आहे. (Mumbai)

या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील नेते आणि पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. सन्मानजनक जागावाटप न झाल्यास मुंबईतील सर्व २२७ जागा स्वबळावर लढवण्याचा पर्याय खुला ठेवावा, असा दबाव थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टाकला जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीसाठी मोठ्या प्रमाणात तडजोड केली, मात्र आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मागे हटू नये, अशी ठाम भूमिका शिंदे गटातील नेत्यांनी घेतली आहे. “महापालिका निवडणूक ही पक्षाची खरी ताकद दाखवणारी असते. त्यामुळे शिवसेनेचा सन्मान अबाधित राहिला पाहिजे,” असे मत नेत्यांनी शिंदे यांच्यासमोर मांडले आहे.
दरम्यान, उमेदवार निवडीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. मंगळवारी २२७ जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. पहिल्याच दिवशी सुमारे २,४०० इच्छुकांनी मुलाखती दिल्याने पक्षात उत्साहाचे वातावरण आहे.
या सगळ्या घडामोडींवर एकनाथ शिंदे यांनी संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे. “केंद्रात एनडीए आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेतील जागावाटपाचाही प्रश्न माझ्यात आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चेतूनच सुटेल,” असे त्यांनी स्पष्ट केले. चर्चा करून सकारात्मक तोडगा निघेल, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला असून लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.







