विशाल शिंदे

नसरापूर : नसरापूरहून राजगड तालुक्याकडे जाणारा प्रमुख संपर्क मार्ग असलेल्या शिवगंगा नदीवरील पुलाची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून पुलावरील रस्त्यात अर्धा ते एक फूट खोल खड्डे पडल्याने वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना या खड्ड्यांचा मोठा फटका बसत असून अनेक लहान-मोठे अपघात घडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाने यापूर्वीही शिवगंगा पुलावरील रस्त्याची डागडुजी केली होती. मात्र, ती कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. काम सुरू असतानाच स्थानिकांनी संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून कामाला विरोध दर्शविला होता. त्यानंतर ज्या ठिकाणी नागरिकांनी आक्षेप घेतला, त्या भागात काही प्रमाणात दर्जेदार काम करण्यात आले. मात्र उर्वरित भागात करण्यात आलेली डागडुजी अल्पावधीतच उखडून गेली असून पुन्हा मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत.
सध्या पुलावरील अनेक ठिकाणी अर्धा ते एक फूट खोल खड्डे पडले असून त्यामध्ये दुचाकीस्वारांचा तोल जाऊन अपघात होत आहेत. पुलाच्या बाजूला असलेले लोखंडी संरक्षक कठडेही अनेक ठिकाणी सैल झाले असून काही भागात नुकसान झाले आहे. त्यामुळे एखादे वाहन खड्ड्यात धडकून नियंत्रणाबाहेर जाऊन थेट पुलाच्या बाजूला आदळण्याची अथवा नदीत कोसळण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, पुलाच्या समस्येबाबत वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी करण्यात येतात. मात्र, प्रत्येक वेळी केवळ तात्पुरती आणि निकृष्ट दर्जाची डागडुजी करून वेळ मारून नेली जाते. कायमस्वरूपी उपाययोजना किंवा पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
विशेष म्हणजे, शिवगंगा नदीवरील हा पूल ब्रिटिशकालीन असून अनेक दशकांपासून या परिसरातील वाहतुकीचा मुख्य आधार आहे. वाढती वाहतूक, जड वाहनांचा ताण आणि पुलाचे वाढते वय लक्षात घेता या पुलाची आयुर्मर्यादा संपत आल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. त्यामुळे केवळ डागडुजी न करता पुलाचे तांत्रिक परीक्षण करून आवश्यक असल्यास नवीन पूल उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
राजगड तालुक्याकडे जाणाऱ्या हजारो नागरिकांसाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा दुवा असल्याने मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलावरील खड्डे तातडीने भरावेत, संरक्षक कठड्यांची दुरुस्ती करावी आणि नवीन पुलाच्या उभारणीचा प्रस्ताव तातडीने मंजूर करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.







