पुणे: पुण्यातील फुरसुंगी येथील एका निवारागृहात कार्यरत असलेल्या 26 वर्षीय कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात मृत कर्मचाऱ्याने लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटच्या आधारे संस्थाचालकाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फलटण तालुक्यातील वडले येथील रहिवासी अतुल अंकुश लाळगे (वय 26) हे गेल्या अडीच वर्षांपासून फुरसुंगी येथील श्री साई सेवाभावी संस्था संचालित खुले निवारागृहात कर्मचारी म्हणून कार्यरत होते. 22 जून रोजी त्यांनी निवारागृहाच्या परिसरात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मृताच्या चुलत भावाने दिलेल्या तक्रारीनुसार, अतुल यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये संस्थाचालक बालाजी मुस्कवाड यांच्याकडून होत असलेल्या मानसिक छळाचा उल्लेख केला आहे. कमी वेतनात जादा काम करून घेणे, विविध घटनांची जबाबदारी एकट्यावर टाकणे, नोकरी सोडल्यास आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी देणे, शिवीगाळ करणे आणि वैयक्तिक कामे करून घेणे, असे गंभीर आरोप नोटमध्ये करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, वाढता कामाचा ताण, वेळेवर वेतन न मिळणे आणि वरिष्ठांकडून होणाऱ्या मानसिक दबावामुळे अतुल नैराश्यात गेले होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या बहिणीसह कुटुंबीयांनाही कामाच्या ठिकाणी होत असलेल्या त्रासाबाबत सांगितल्याचा दावाही करण्यात आला आहे.
दरम्यान, सुसाईड नोटमध्ये संस्थेतील लहान मुलांशी संबंधित कथित गैरप्रकारांची चौकशी करून न्याय मिळावा, अशी मागणीही करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी संस्थाचालक बालाजी मुस्कवाड यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून, सुसाईड नोटमधील सर्व आरोप आणि संस्थेतील कथित गैरप्रकारांचा सखोल तपास सुरू आहे.






