लोणी काळभोर, ता. 26 : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे पाणीपुरवठा योजनेवरून (Haveli News) वाद निर्माण झाला असून एमजीपीच्या अधिकृत लाईनमधून सत्ताधारी गटाशी संबंधित दोन जणांच्या खाजगी पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी. आणि संबंधित दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी प्रतिक काळभोर यांनी केली आहे.

पांडवदंड रस्त्यावर एमजीपीच्या मुख्य लाईनमधून दोन खाजगी पाईपलाईन नेण्याचे काम सुरू असल्याच्या वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. कवडी माळवाडी परिसरात पाण्याचा तीव्र तुटवडा असताना अधिकृत एमजीपीचे काम बंद आहे; मात्र दोन वैयक्तिक पाईपलाईनचे काम सुरू असल्याने संशय व्यक्त केला जात आहे. “हे काम कोणाच्या परवानगीने सुरू आहे? एमजीपीने आजपर्यंत कारवाई का केली नाही? यामागे संगनमत तर नाही ना?” असा सवाल प्रतिक काळभोर यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना प्रतिक काळभोर म्हणाले की, एमजीपीच्या लाईनमधूनच या दोन पाईपलाईन पुढे नेल्या जात असून भविष्यात या माध्यमातून पाण्याची विक्री करण्याचा डाव असू शकतो. “हे पाणी फक्त दोन घरांसाठी आहे का? मग संपूर्ण गावाला पाण्याशिवाय ठेवणार का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सत्तेचा गैरवापर करून अनधिकृत कामे सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
“आम्ही कोणत्याही संगनमतात नाही; केवळ चुकीच्या कामांना विरोध करतो. जल जीवन मिशनच्या विकास आराखड्यानुसार पारदर्शक पद्धतीने कामे व्हावीत, ही आमची अपेक्षा आहे,” असे सांगत संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रतिक काळभोर यांनी केली.
कदमवाकवस्तीचे माजी उपसरपंच ऋषिकेश काळभोर यांनी सांगितले की, पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत संबंधित पाईपलाईन कोणाची आहे, याची माहिती देण्यात आली होती आणि तेव्हा काम थांबवण्यात आले होते. “मात्र अचानक हे काम पुन्हा सुरू करण्यात आले. आम्ही तत्काळ घटनास्थळी जाऊन काम बंद पाडले. कवडी माळवाडीला पाणी नाही आणि खाजगी पाईपलाईन टाकून भविष्यात पाणी विक्रीचा प्रयत्न केला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला. काम कायमस्वरूपी बंद न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, प्रीतम गायकवाड यांनी आपली बाजू मांडताना सांगितले की, “माझ्या शेतीसाठी पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होते. काही जणांनी आक्षेप घेतल्याने आम्ही काम तात्पुरते थांबवले आहे. गावातील राजकारणामुळे हा वाद निर्माण झाला असून आमचा कोणाशीही वाद घालण्याचा हेतू नाही.”
“पाणीपुरवठा योजनेचे काम जवळपास 70 टक्के पूर्ण झालेले असताना काही जण मुद्दाम ही योजना बंद पाडण्याचा डाव आखत आहेत. गावकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर राजकारण करणे अत्यंत निंदनीय आहे. योजनेमध्ये कुठेही चुकीचे काम झाले असेल तर संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी; मात्र जर कोणी जाणूनबुजून शासकीय योजना अडवण्याचा प्रयत्न करत असेल, शिवरस्त्यावरून माळवाडीला पाईपलाईन नेण्यास जे अडथळे निर्माण करतील त्यांच्यावरही प्रशासनाने कठोर कारवाई करावी. तसेच प्रशासनाने वेळ न दवडता ही योजना तातडीने पूर्ण करावी आणि मायबाप जनतेचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा.”
-चित्तरंजन गायकवाड (माजी सरपंच, कदमवाकवस्ती, ता. हवेली)







