Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांचे नाव जाहीर करताना कार्यकारी अध्यक्ष Praful Patel यांनी सांगितले की, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा भरारी घेईल.

पटेल यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या नेतृत्वगुणांचे कौतुक करत सांगितले की, व्यक्ती पदानं नव्हे, तर कर्तृत्वानं महान होते. “दादा सर्वार्थानं दादा होते, ते कधीही खचले नाहीत. पक्ष आणि कार्यकर्त्यांसाठी अजितदादांच्या मनात तळमळ होती,” असे पटेल म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना पटेलांनी अप्रत्यक्षपणे पक्षाचे आमदार Rohit Pawar यांच्यावर टीका केली. “सध्या काही जण आम्हाला पक्ष कसा चालवायचा याचे सल्ले देत आहेत. ज्यांचं आमच्या पक्षाशी काहीही देणं-घेणं नाही, ते आम्हाला उपदेश करत आहेत. महिन्याभरात तुम्ही पाहिलंच असेल. काही जण इकडे तिकडे फिरत आहेत. त्यांच्या पोटात एक आणि ओठात एक,” असे ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी अपघाती निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला. त्यांच्या निधनानंतर तीन दिवसांनी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण येईल, याबाबत चर्चा सुरु होती आणि आज त्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
सुनेत्रा पवार यांनी 2024 मध्ये बारामतीतून लोकसभेची निवडणूक लढवली होती, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव झाला. त्यानंतर त्यांना राज्यसभेत स्थान मिळाले. अजित पवारांच्या अकाली निधनानंतर उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे त्यांनी हाती घेतली आणि आता पक्षाची जबाबदारीही त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. लवकरच त्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देतील आणि बारामतीतून विधानसभेची पोटनिवडणूक लढवतील, जी बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे.







