मुंबई: राज्य सरकारने महसूल विभागाशी संबंधित तीन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सरकारी जमिनीवरील 2011 पर्यंतची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात आली असून, यासाठी राज्यभरात 115 सहअध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे.

या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून सरकारी जमिनीवर घर बांधून राहणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा समित्यांच्या माध्यमातून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पात्र कुटुंबांना त्यांच्या घरांचा कायदेशीर हक्क मिळवून देणे हा या प्रक्रियेचा मुख्य उद्देश आहे.
दरम्यान, शहरी भागातील फ्लॅटधारकांसाठीही सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील सुमारे 7 कोटी सदनिकाधारकांना डिजिटल व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड देण्याची योजना आखण्यात आली आहे. या कार्डमध्ये फ्लॅटची मालकी, बँकेचे कर्ज, गहाणखत, मालमत्ता कर, सोसायटीची थकबाकी आणि न्यायालयीन निर्बंध यांची माहिती नोंदवली जाणार आहे.

या नियमांचा प्राथमिक मसुदा महसूल विभागाच्या संकेतस्थळावर 30 दिवसांसाठी प्रसिद्ध केला जाणार आहे. नागरिकांच्या सूचना आणि हरकती विचारात घेऊन पुढील दोन महिन्यांत अंतिम नियमावली तयार केली जाईल, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.






