लोणी काळभोर, ता. 21: कदमवाकवस्ती (ता. हवेली) परिसरात वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा बनावट फोन करून पोलीस यंत्रणेची दिशाभूल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वारंवार खोटे कॉल करून लोणी काळभोर पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार अंकुश गणपत घुले यांनी सरकारतर्फे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (pune crime news)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकुश घुले हे गुरुवारी (ता.19) ‘112 बीट मार्शल’ म्हणून कर्तव्य बजावत होते. दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास बीट मार्शलच्या एमडीटी डिव्हाइसवर एक कॉल प्राप्त झाला. इंदिरानगर परिसरात काही मुलींना जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याची माहिती कॉलरने दिली. या गंभीर माहितीची दखल घेत पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व परिसरात सखोल तपासणी व पेट्रोलिंग केले. मात्र दिलेल्या ठिकाणी कोणताही संशयास्पद प्रकार आढळून आला नाही.
दरम्यान, त्याच मोबाईल क्रमांकावरून पोलिसांना पुन्हा पुन्हा कॉल येत राहिले. प्रत्येक वेळी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली; परंतु प्रत्यक्षात कोणतीही घटना घडलेली नसल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्या क्रमांकावर संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला, मात्र संबंधित व्यक्तीने फोन उचलला नाही.
विशेष म्हणजे याच क्रमांकावरून एक दिवस आधी म्हणजे 18 फेब्रुवारीलाही अशाच प्रकारचे कॉल करून हॉस्टेल परिसरात कॉलेजच्या मुलींकडून वेश्याव्यवसाय व गांजा विक्री सुरू असल्याची खोटी माहिती देण्यात आली होती. त्यावेळीही पोलिसांनी तपास केला असता ती माहिती पूर्णपणे खोटीअसल्याचे समोर आले.
या प्रकारामुळे लोणी काळभोर पोलिसांची मोठी धावपळ झाली तसेच आपत्कालीन सेवांचा गैरवापर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अखेर हा कॉलर जाणीवपूर्वक खोटी माहिती पोलीस प्रशासनाला देत असल्याचे समोर आले. त्यामुळे संबंधित मोबाईल क्रमांकधारक व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 217 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







