पुणे: राज्यात निवडणुकीची तयार वेगाने सुरु झाली आहे. दरम्यान, महापालिका निवडणुका लांबणीवर पडणार असल्याच्या चर्चांना उधान आले आहे. 27 टक्के ओबीसी आरक्षणासंदर्भातील वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे महापालिका निवडणुकाबद्दल अनिश्चितता कायम आहे. खंडपीठाने यासंबंधी पुढील सुनावणी 25 नोव्हेंबरला ठेवली आहे. यामुळे ही सुनावणी होईपर्यंत राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या निवडणुकांच्या घोषणा होणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.

8 ते 19 डिसेंबर या दरम्यान राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन घेण्यात येणार असल्यामुळे या काळात निवडणुकीची घोषणा केली जाण्याची शक्यता फारच कमी असते. यामुळे अनेक महिन्यांपासून तयारीला लागलेल्या इच्छुक उमेदवारांमध्ये सध्या निराशा पसरली आहे.
रखडलेल्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी जोमाने तयारी सुरू ठेवली होती. त्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले. अनेकांनी पॅनेलही तयार केले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीमुळे सध्या उमेदवारांनी प्रचाराचा वेग कमी केला आहे. सद्यस्थिती पाहता, 31 जानेवारी पूर्वी निवडणुका होण्याची शक्यता कमी असून, महापालिका निवडणुका मे किंवा जूनमध्येही होऊ शकतात, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.







