उरुळी कांचन, ता. 31: राज्य शासनाने ग्रामविकासाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानाअंतर्गत घेतलेला निर्णय उरुळी कांचन गावासाठी गेमचेंजर ठरत आहे. मागील दोन दिवसात तब्बल 55 लाख रुपये कर जमा झाला असल्याची माहिती ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश गळवे यांनी दिली. (Uruli Kanchan)

सवलतीचा लाभ घेण्यासाठी नागरिक सकाळपासूनच ग्रामसचिवालय केंद्रांवर दाखल होत असून, अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, व्यापारी तसेच मध्यमवर्गीय कुटुंबांनी या सवलतीचा मोठ्या प्रमाणावर फायदा घेतला आहे. थकबाकीदार करदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही 50 टक्के सवलत जाहीर केली होती. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली घरपट्टी भरण्यास नागरिक पुढे सरसावले आहेत.
राज्य शासनाने अनेक वर्षांपासून थकीत राहिलेल्या घरपट्टी व पाणीपट्टी करावर थेट 50 टक्के सवलत दिल्याने नागरिकांना मोठा दिलासा आणि ग्रामपंचायतींसाठी एक प्रकारची आर्थिक नवसंजीवनी साधण्याची संधी उपलब्ध झाली आहे. शासन निर्णयानुसार 1 एप्रिल 2025 पूर्वीचा थकीत निवासी मालमत्ता कर व पाणीपट्टी ही सवलतीच्या कक्षेत येणार आहे. नागरिकांनी 31 डिसेंबर 2025 पूर्वी एकरकमी कर भरल्यास त्यांना कराच्या मूळ रकमेत 50 टक्के सूट दिली जाणार असल्याने नागरिकांनी उरुळी कांचन ग्रामसचिवालयात मोठी गर्दी केली आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासनाने नागरिकांना सवलतीच्या कालावधीतच कर भरण्याचे आवाहन केले आहे. सवलतीची मुदत संपल्यानंतर पूर्ण घरपट्टीसह दंड आकारला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित नागरिकांनीही या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. एकूणच 50 टक्के सवलतीच्या निर्णयामुळे ग्रामपंचायतीच्या महसुलात वाढ होण्याची शक्यता असून, नागरिकांनाही आर्थिक दिलासा मिळाल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे.
याबाबत बोलताना ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश गळवे म्हणाले, “राज्य शासनाने अंतिम मुदत 31 डिसेंबर दिलेली आहे. त्यामुळे जर शासनाने मुदत वाढवली तर ग्रामपंचायत स्तरावर मुदत वाढवायचा अधिकार ग्रामपंचायतीला आहे. त्यामुळे आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे नागरिकांनी लवकर पैसे भरावेत. जोपर्यत नागरिक रांगेत उभे आहेत तोपर्यत कार्यालय आज सुरु राहणार आहे. त्यामुळे सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा.







