दौंड: गेल्या दोन दिवसांपासून दौंड (Daund News) तालुक्यात निसर्गाचा लहरीपणा पाहायला मिळाला. 18 आणि 19 मार्च रोजी झालेल्या अचानक अवकाळी पाऊस आणि भीषण गारपिटीने शेती पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. हाताशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, या संकटाच्या काळात प्रशासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात पावसाचा आणि गारांचा जोर सर्वाधिक होता. विशेषतः यवत, यवत स्टेशन, उंडवडी, खामगाव, खानोटे, पिलानवाडी, दहीटने आणि राहू या गावांना भीषण गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. गारांमुळे शेतातील कांदा, पालेभाज्या, फळबागा आणि चारा पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके जमिनीदोस्त झाली असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
या भीषण परिस्थितीची गंभीर दखल घेत आमदार राहुल कुल यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी महसूल आणि कृषी विभागाला ‘शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. “बळीराजावर आलेलं हे संकट मोठं आहे, अशा वेळी त्वरित पंचनामे होणे गरजेचे आहे,” असे आमदार राहुल कुल यांनी सांगितले आहे. आमदार राहुल कुल यांनी पुढे सांगितले कि, नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल लवकरात लवकर तयार करून तो शासनाकडे सादर करावा. तसेच बाधितांना शासनाकडून योग्य ती मदत आणि नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी त्वरित प्रयत्न करावे.







