दौंड, ता. 23 : दुचाकीला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून तरुण वकिलाला बापलेकाने लाथाबुक्यांनी व लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (ता. 20) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास खोरवडी (ता.दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील आव्हाळे वस्ती येथे दौंड ते सिध्दटेक जाणाऱ्या रोडवर हि घटना घडली आहे. (Daund Crime)

महेश संतोष काळे (वय- 25, व्यवसाय-वकील रा. आलेगाव (काळेवस्ती) ता. दौंड) असे मारहाण झालेल्या वकिलाचे नाव आहे. याप्रकरणी काळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नामदेव भिकाजी सुर्यवंशी व स्वप्नील नामदेव सुर्यवेशी (रा.दोघेही देऊळगावराजे ता. दौंड) यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा: पुण्यात भररस्त्यात राडा! बीजेएस कॉलेजबाहेर विद्यार्थ्याला बेदम मारहाण; पाहा व्हिडीओ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदर महेश काळे हे शनिवारी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ते मोटार सायकलवरून दौंड ते सिद्धटेक जाणाऱ्या रस्त्यावरून निघाले होते. खोरवडी येथील आव्हाळे वस्ती परिसरात नामदेव सुर्यवंशी व त्यांचा मुलगा स्वप्नील सुर्यवंशी (दोघे रा. देवळगावराजे, ता. दौंड) यांनी त्यांच्या दुचाकीला कट मारला.
यावेळी फिर्यादीने कट का मारला अशी विचारणा केली असता, आरोपींनी शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण करीत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच “तुला आज जिवे मारून टाकतो” अशी धमकी देत स्वप्नील सुर्यवंशी याने जवळच पडलेल्या लोखंडी रॉडने फिर्यादीवर हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
हेही वाचा: पुण्यात ‘दादां’ना मोठं चॅलेंज! आणखी एक शिलेदार राष्ट्रवादी सोडणार? पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर
या प्रकरणी भा.न्या.सं. कलम 118(2), 115(2), 351(2), 352 व 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार म्हेत्रे करत आहेत.







