पुणे: पुणे (Crime News) जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या एका 15 वर्षांच्या मुलीला शोधण्यात पोलिसांना यश आले असून, तिला पळवून नेणाऱ्या २२ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. मयूर रमेश वघरे असे या आरोपीचे नाव असून तो गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी आहे. गेल्या वर्षी २८ सप्टेंबर रोजी ही मुलगी गायब झाली होती, ज्याची तक्रार पोलिसांत नोंदवण्यात आली होती. पोलिसांनी अनेक महिने वर्धा, नागपूर आणि गोंदिया परिसरात शोध घेतला, परंतु आरोपी वारंवार आपले ठिकाण बदलत असल्याने पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हते.

या प्रकरणाचा छडा लावण्यात सोशल मीडियामधील इन्स्टाग्रामने महत्त्वाची भूमिका बजावली. आरोपीने काही दिवसांपूर्वी त्याच्या एका मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती. या स्टोरीमुळे पोलिसांना त्याचे लोकेशन समजले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी एक मोठा सापळा रचला. या कारवाईत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने आरोपीच्या ओळखीच्या व्यक्तीची मैत्रीण असल्याचे नाटक केले आणि त्याला भेटायला बोलावले.
पोलिसांनी आरोपीला आधी पुण्यात १२ तास आणि नंतर बारामतीत ६ तास थांबायला लावले. शेवटी त्याला इंदापूर येथील भवानीनगर बस स्टॉपवर बोलावण्यात आले. आरोपी तिथे पोहोचल्यानंतर पोलिसांनी व्हिडिओ कॉलद्वारे तोच असल्याची खात्री केली आणि त्याला बेड्या ठोकल्या. न्यायालयाने त्याला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या गुन्ह्याचा अखेर छडा लागला आहे.






