Pune News: पुणे : शहरासह परिसरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पीएमपीएमएलकडून (PMPML) एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पीएमपीएमएलने मोराची चिंचोली आणि पाबळ या पर्यटनस्थळांसाठी नवीन विशेष बस सेवा सुरू केली आहे. या सेवेचा लाभ पर्यटकांना सहज आणि कमी खर्चात घेता येणार असून, पुण्यातील नागरिकांसह बाहेरील पर्यटकांनाही याचा फायदा होणार आहे. Pune News

मोराची चिंचोली हे गाव पुणे-अहमदनगर महामार्गावर शिरूरजवळ वसलेले आहे. अहमदनगर मार्गावरून शिक्रापूर फाट्यावर डाव्या बाजूने वळल्यानंतर हे गाव लागते. नावाप्रमाणेच या गावात मोठ्या प्रमाणावर मोर आढळतात. तसेच चिंचेच्या झाडांनी वेढलेले हे गाव निसर्गप्रेमी पर्यटकांसाठी आकर्षण ठरले आहे. शांत वातावरण, मोकळी हवा आणि निसर्गसौंदर्यामुळे राज्यासह देशातील अनेक भागांतून पर्यटक येथे येत असतात.
पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही विशेष बस सेवा प्रत्येक शनिवार आणि रविवारी स्वारगेट व पुणे स्टेशन येथून सुटणार आहे. या बसद्वारे प्रवास करणाऱ्या पर्यटकांना सर्वप्रथम पाबळ येथील ऐतिहासिक मस्तानीची कबर पाहता येणार आहे. त्यानंतर पाबळमधील जैन समाजाचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या मणिभद्र मंदिराला भेट देण्याची संधी मिळणार आहे. पुढे या बसद्वारे मोरांसाठी प्रसिद्ध असलेल्या मोराची चिंचोली येथे नेण्यात येणार असून, पर्यटकांना दिवसभर तेथे फिरण्याची मुभा असणार आहे.
पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांच्या संकल्पनेतून मार्ग क्रमांक 7 A सुरू करण्यात आला आहे. या बस सेवेच्या माध्यमातून एका दिवसात ऐतिहासिक स्थळे, धार्मिक ठिकाणे आणि निसर्गरम्य परिसर पाहण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे या भागातील पर्यटन वाढण्यास मदत होणार असून, स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.





