पुणे: आखाती देशांमध्ये पेटलेल्या युद्धाच्या वणव्याचे चटके आता थेट महाराष्ट्रातील सर्वसामान्यांना बसू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे राज्यात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी (LPG) साठ्याबाबत धोक्याची घंटा वाजली असून, सरकारने इंधन वितरणावर अघोषित निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे.

अन्न व नागरी पुरवठा विभागाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्राकडे सध्या अत्यंत मर्यादित इंधन साठा शिल्लक आहे. राज्याचा विचार करता, पेट्रोल केवळ 15 दिवस पुरेल इतका साठा, डिझेलचा साधारण 18 दिवसांचा साठा उपलब्ध आहे. सर्वात चिंताजनक स्थिती गॅसची असून, राज्याकडे फक्त 5 ते 6 दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे.
मुंबईसह राज्यभरातील अनेक गॅस एजन्सींनी सिलिंडर बुकिंगवर कडक निर्बंध लादले आहेत. यापूर्वी ग्राहकांना 15 दिवसांच्या अंतराने दुसरे सिलिंडर बुक करता येत होते, मात्र आता एकदा सिलिंडर घेतल्यावर पुढील बुकिंगसाठी पूर्ण एक महिना वाट पाहावी लागणार आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरची विक्री अनेक ठिकाणी आधीच बंद करण्यात आली आहे. जर हे युद्ध लवकर थांबले नाही, तर केवळ इंधन दरवाढच नाही, तर इंधनाचा तुटवडा ही जाणवू शकते.







