कळंबोली: पोलीस दलात भरती होऊन खाकी वर्दी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो तरुणांची सध्या राज्यभर धावपळ सुरू आहे. मात्र, यश मिळवण्यासाठी काही उमेदवार चक्क शॉर्टकटचा अवलंब करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नवी मुंबई पोलीस भरती प्रक्रियेत शारीरिक चाचणीदरम्यान स्वतःची क्षमता वाढवण्यासाठी ‘स्टिरॉइड’ किंवा उत्तेजक इंजेक्शनचा वापर करणाऱ्या चार उमेदवारांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे.

कळंबोली येथील पोलीस मैदानावर रविवारी उमेदवारांची शारीरिक चाचणी सुरू होती. धावण्याच्या शर्यतीपूर्वी काही उमेदवारांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची झडती घेण्याचे आदेश दिले. यावेळी तपासणीत चार उमेदवारांनी त्यांच्या अंडवेअरमध्ये लपवून ठेवलेली इंजेक्शन आणि सिरिंज आढळून आली. ही इंजेक्शन टोचून कृत्रिमरित्या शारीरिक ताकद वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
याप्रकरणी आकाश पानसरे, सुयोग होले, सुनील कडुसकर आणि संकेत डोंगरे या चार तरुणांवर कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे उमेदवार जुन्नर आणि अहिल्यानगर (नगर) भागातील रहिवासी असून याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.







