इंदापूर: इंदापूर तालुक्यातील भिगवण (Bhigwan News) येथील ज्या कथित अपहरण प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळबळ उडवून दिली होती, त्या प्रकरणाला आता एक नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. आई आणि भावाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून मुलीला पळवून नेल्याचा दावा स्वतः पीडित तरुणीनेच खोडून काढला आहे. “माझं अपहरण झालं नसून मी स्वमर्जीने प्रेमासाठी घर सोडलं,” असा खळबळजनक खुलासा तिने केला आहे.

तरुणीचं तिच्या कुटुंबीयांसमोरच अपहरण करण्यात आल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी या घटनेवरून कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.आरोपींनी डोळ्यात मिरचीपूड टाकली आणि काठीने हल्ला करून मुलीला ओढत नेलं, असा गंभीर आरोप तरुणीच्या आई-भावाने केला होता.
आता समोर आलेल्या माहितीनुसार, हे ‘अपहरण’ नसून ‘लव्ह मॅरेज’साठी केलेला बनाव होता. संबंधित तरुणीचे एका तरुणासोबत गेल्या एक वर्षापासून प्रेमसंबंध होते. दोघांना लग्न करायचं होतं, पण घरच्यांचा विरोध होता. विशेष म्हणजे, घरच्यांनी तिचा विवाह २२ फेब्रुवारी रोजी दुसऱ्याच एका तरुणाशी निश्चित केला होता. आपल्या इच्छेविरोधात लग्न होत असल्याचं पाहून तरुणीने प्रियकराच्या मदतीने पळून जाण्याचा निर्णय घेतला.
तरुणीने स्पष्ट केलं की, घटनेच्या दिवशी तिनेच प्रियकराला आपण कुठे भेटायचं, याचा पत्ता दिला होता. बाजारात जाण्याच्या बहाण्याने ती घराबाहेर पडली आणि संधी मिळताच प्रियकरासोबत कारमध्ये बसून निघून गेली. आई-भावाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकल्याचा किंवा मारहाण झाल्याचा सर्व प्रकार केवळ लग्नाला विरोध करण्यासाठी रचलेला बनाव असल्याचं तिने असून मला आता घरी जाणार नसून मला याचा घरी राहायचं आहे. मी याचा सोबतच लग्नही करणार असल्याचं तरुणीने जबाबात सांगितले आहे.







