बारामती: शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर (Baramati News) लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील माळेगाव येथे उघडकीस आली आहे. ‘अंतर्गत परीक्षेचे गुण माझ्या हातात आहेत’ अशी धमकी देत एका प्राध्यापकाने विद्यार्थिनीला अश्लील मेसेज पाठवून तिच्यावर दबाव टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पालकांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माळेगाव येथील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये डिप्लोमाच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीला आरोपी प्राध्यापक नितीन शंकर तावरे याने लक्ष केले. 22 जानेवारी ते 12 फेब्रुवारी 2026 या कालावधीत हा छळ सुरू होता. हा प्राध्यापक वर्गात शिकवताना विद्यार्थिनींना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे आणि त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणे, अशा तक्रारीही समोर आल्या आहेत.
विद्यार्थिनीने जेव्हा या प्रकाराला विरोध केला किंवा मेसेजला उत्तर देण्याचे टाळले, तेव्हा आरोपीने आपल्या पदाचा गैरवापर केला. “अंतर्गत परीक्षेचे 30 गुण माझ्या हातात आहेत,” अशी उघड धमकी देऊन त्याने विद्यार्थिनीला मानसिक दडपणाखाली ठेवले. वर्गात मुलींचा अपमान करणे आणि त्यांना कमी लेखणे हा या विकृत शिक्षकाचा जणू नित्यक्रमच बनला होता. अखेर पीडित तरुणीने अखेर घडलेला प्रकार घरी सांगितला असता त्यांनी अखेर तक्रार दाखल केली.







