मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातील (Ajit Pawar) कामाचा माणूस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित पवार यांचा विमान अपघातात (Ajit Pawar) झालेल्या निधनामुळे अनेकांना धक्का बसला आहे. मात्र, या दुर्दैवी घटनेभोवती आता संशयाचे दाट धुके साचू लागले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या मृत्यूमागे ‘मोठे कारस्थान’ असल्याचे सांगत, या प्रकरणाची तुलना थेट वादग्रस्त ‘जस्टिस लोया’ प्रकरणाशी केली आहे. राऊतांच्या विधानामुळे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात आता ‘घातपाता’च्या चर्चेने उग्र रूप धारण केले आहे.

संजय राऊत यांनी या प्रकरणाचा जो घटनाक्रम मांडला आहे, तो अत्यंत गंभीर असून राऊतांच्या दाव्यानुसार:
-
मृत्यूच्या 10 दिवस आधी अजित पवारांनी आपण पुन्हा शरद पवारांकडे म्हणजेच ‘स्वगृही’ परतण्यास इच्छुक असल्याचे बोलून दाखवले होते.
-
काही सत्ताधारी नेत्यांनी अजित पवारांना जुन्या ‘सिंचन घोटाळ्याच्या’ फाईल्स उघडून धमकावल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. या धमकीला दादांनी चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर हा अपघात झाला, हा निव्वळ योगायोग आहे की पूर्वनियोजित कट? असा जळजळीत सवाल राऊतांनी विचारला आहे.
राऊत यांच्या मते, समोर येत असलेली तथ्ये पाहता हा अपघात नसून घातपात असण्याची शक्यता जास्त आहे. “ज्या पद्धतीने जस्टिस लोया यांच्या बाबतीत घडले, तसेच काहीसे इथेही दिसतेय का?” असे विचारत त्यांनी अनेकांवर न कळत निशाणा साधला आहे. खुद्द अजित पवारांच्या पक्षातील काही नेत्यांनाही आता या मृत्यूबाबत संशय वाटू लागला आहे, ही बाब अधिक चिंताजनक आहे.







