लोणी काळभोर, ता. 29: लोणी काळभोर, हडपसर, उरुळी देवाची परिसरात असलेल्या लॉज व मसाज सेंटरच्या नावाखाली छुप्या पद्धतीने सुरु असलेल्या देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या कारवाईत वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर पिडीत महिलांची सुखरूप सुटका केली आहे. तर दुसरीकडे उरुळी कांचनसह जिल्ह्यात वेश्याव्यवसायासह सर्वच प्रकारचे अवैध धंदे खुलेआम सुरु असताना देखील पोलिसांनी याकडे कानाडोळा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. (pune latest crime news)

पुणे जिल्ह्यातील महामार्गांलगतच्या ठरावीक ढाब्यांवर व हॉटेलांमध्ये सर्रास वेश्या व्यवसाय सुरू असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये होत आहे. या अवैध धंद्यात मोठे अर्थकारण दडलेले असल्याने काही गुंडांनी त्यात भक्कम पाय रोवले आहेत. या अवैध व्यवसायावर कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेंतर्गत पिटा सेल आहे. पण गेल्या तीन-चार वर्षांपासून या सेलने तुटपुंज्या कारवाया केल्याच्या दिसून येत आहे. या धंद्याकडे जाणीवपूर्वक होत असलेले दुर्लक्ष आता खाकी वर्दीबद्दल संशय निर्माण करणारे ठरत आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन, यवत, दौंड, भिगवण व इंदापूर या ठिकाणी राजरोसपणे वेश्या व्यवसाय चालत आहेत. हडपसर-सासवड व सासवड-बारामती रस्त्यावरील अनेक लॉजिंगमध्ये छुप्या पद्धतीने वेश्यागमन सुरु आहे. नगर रस्त्यावरील वाघोली, लोणीकंद व शिक्रापूर परिसरात तर या व्यवसायाला ऊत आलेला आहे. काही हॉटेल ढाबे तर याच गोष्टींसाठी आंबट शौकिनांमध्ये प्रसिद्ध आहेत. पोलिसांनी काही ठिकाणी सुरु असलेल्या वेश्याव्यवसायांवर कारवाई केली आहे. तेंव्हा परराज्यातील महिला युवतींकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याचे तेव्हा समोर आले होते. छापा पडल्यानंतर काही दिवस व्यवसाय बंद असायचा, पण त्यातील अर्थकारण मोठे असल्याने पुन्हा हे व्यवसाय सुरू झाले आहेत. अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.
दरम्यान, जिल्ह्यात अवैध धंदे बोकाळले आहेत. गावागावात मटका, जुगार, हातभट्टी, गांजा, गुटखा व देहविक्रीसारख्या अवैध व्यवसायांनी हळू हळू डोके वर काढले आहे. अवैध धंद्यांचा खुलेआम सुळसुळाट सुरु असताना देखील पोलीस प्रशासनाकडून मात्र कारवाईचा बडगा उगारल्याचे दिसून येत नाही. पोलीस प्रशासनाकडून हाताची घडी अन तोंडावर बोट ठेवून अप्रत्यक्षरीत्या अवैध धंद्यांना पाठबळ दिले जात आहे का? अशी चर्चा नागरिकांमध्ये जोरदार सुरु आहे.
सोरतापवाडी येथील लॉजवर कारवाई कधी?
सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील वाकड्या पुलापासून 150 मीटर अंतरावर बार व लॉज आहे. या लॉजमधून वेश्याव्यवसाय सुरु असून ग्राहकांकडून 1200 रुपये घेतले जात असल्याची चर्चा केली जात आहे. हा एवढा मोठा खुलेआम लॉज सुरु असतानादेखील पोलीस प्रशासनकडून अद्याप कारवाई केली जात नाही. हा लॉज नेमका कोणाच्या आशीर्वादाने चालतो. याचे गौडबंगाल अद्यापपर्यंत समजले नाही. हा लॉज चालू ठेवण्यासाठी वरदहस्त देणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल काय कारवाई करणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
पोलिस अनभिज्ञ कसे?
जिल्ह्यात वेश्या व्यवसाय सर्रास सुरू असुनही छापे पडत नाहीत. पोलिसांना या व्यवसायाची खबर कशी मिळत नाही, हे आश्चर्यच आहे. अनैतिक व्यवसायांवर कारवाईसाठी गुन्हे शाखेअंतर्गत पिटा सेल कार्यरत आहे. पण या सेलचे पोलिस नेमके करतात तरी काय? हे एक, न उलघडणारे कोडेच म्हणावे लागेल. पोलिसांनी वेळीच कारवाया केल्या नाही, तर खाकीबद्दल जणमाणसात संशयाचे वातावरण तयार होईल.







